आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यविधीसाठी लाकडे, रॉकेल मोफत मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आल्याचे कारण पुढे करत प्रशासनातर्फे अंत्यविधीसाठी मोफत साहित्य देण्याचे 1 डिसेंबर 2013पासून बंद केले होते. कायदेशीर त्रुटी दूर करत प्रशासनातर्फे महापालिका स्थापनेनंतर पहिलीच उपविधी तयार करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी (दि.13 मे) होणार्‍या महासभेत या उपविधीला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीत एकूण पाच स्मशानभूमी आणि पाच ठिकाणी विविध जाती-धर्माच्या दफनभूमी आहेत. नगरपालिका असतानापासून हिंदू धर्मियांच्या अंत्यविधीसाठी विनामूल्य लाकडे, मुस्लिम धर्मियांच्या अंत्यविधीसाठी बरगे तर नाथजोगी समाजाच्या दफनविधीसाठी मिठाचा पुरवठा करण्यात येत होता. महापालिका स्थापनेनंतरही हीच पद्धती सुरू होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियमात यासंदर्भातील तरतूद नसल्याने लेखापरीक्षण अहवालात यासाठी होणार्‍या खर्चावर ताशेरे ओढण्यात आले होते. अंत्यविधीसाठी साहित्य पुरविण्याचा विषय महासभेत आल्यावर कायदेशीर अडचणी असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते.
नाशिक, नगर, धुळ्यासह राज्यातील इतर महापालिकांमध्येही अंत्यविधीचे मोफत साहित्य पुरवले जात असल्याकडे ‘दिव्य मराठी’ ने लक्ष वेधले होते. जळगाव महापालिकेत एकही उपविधी नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर प्रशासनातर्फे राज्यातील इतर महापालिकांनी केलेल्या उपविधींची माहिती मागवली होती. अखेर पालिका स्थापनेनंतर मंगळवारी होणार्‍या महासभेत जळगाव महापालिका प्रशासन पहिलीच उपविधी मंजूर करणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी ही उपविधी पाठवली जाते. राज्य शासनाने मंजुरी दिल्यावर राजपत्रात प्रसिद्धीपासून शहरात अंत्यविधीसाठी मोफत साहित्य पुरवठय़ाचा मार्ग मोकळा होणार आहे.
सामानासाठी दाखला आवश्यक
अंत्यविधीसाठी मोफत साहित्य पुरवण्यास हरकत नसल्याचा दाखला स्मशानभूमीत द्यावा लागणार आहे. या दाखल्यावर महापौर, उपमहापौर, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, खाते प्रमुख, शिक्षण मंडळ सभापती, पालिका अथवा शासकीय शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलिस पाटील, तलाठी, सर्व शासकीय अथवा खासगी डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, अथवा मानसेवी दंडाधिकारी यांच्या पैकी एकाची स्वाक्षरी आवश्यक राहणार आहे.