आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभियांत्रिकीचे प्रवेश पुढे ढकलले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आयआयटीची प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे आणि राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा लवकर संपत असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या बाबतीत संभ्रमात पडले आहेत. राज्यात लागू असलेल्या बाद पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. या सगळ्या गोष्टींवर विचार करत तंत्रशिक्षण खात्याने राज्यातील अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. या बदलामुळे 22 जुलै रोजी सुरू होणारी अभियांत्रिकी महाविद्यालये 1 ऑगस्ट रोजी सुरू होऊ शकतात, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक महेश शिवणकर यांनी दिली.

‘गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार फटका’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने आयआयटी आणि राज्यातील प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळ समोर आणल्यानंतर पालकांनी या प्रकरणातून योग्य मार्ग काढावा, अशी मागणी तंत्रशिक्षण विभागाकडे केली. यावर विचार करून राज्य शासनाने हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. सध्याची अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही तशीच सुरू राहील, असेही शिवणकर यांनी सांगितले. शहरात चार एआरसी सेंटर असून यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एआरसी सेंटरवर 750, बांभोरीच्या एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात 128, देवकर अभियांत्रिकीत 85 तर गोदावरी अभियांत्रिकीच्या एआरसी सेंटरवर 80 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी 13 जूनपर्यंत नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. तिला 18 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तत्पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

काय होईल विद्यार्थ्यांना फायदा
या वर्षी आयआयटीची प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश घ्यावा हे कळत नाही. आठ दिवस प्रवेश प्रक्रिया पुढे घेतल्यास तोपर्यंत आयआयटी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी होईल व प्रवेश कुठे घ्यावा हे कळेल.

न्यायालयाच्या आदेशानुसार बदल
उच्च् न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 1 ऑगस्ट रोजी महाविद्यालय सुरू होणे अपेक्षित आहे. आम्ही केलेल्या नियोजनानुसार ते 22 जुलै रोजी सुरू होते आहे. पालकांच्या मागणीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मात्र, होणारा बदल हा न्यायालयाच्या आदेशानुसारच राहील.
-महेश शिवणकर, तंत्रशिक्षण सहसंचालक