आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरपत्रिका फेरफारीचा पर्दाफाश!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केसीई सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या उत्तरपत्रिका फेरफारप्रकरणी मंगळवारी महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोप करण्यात आलेल्या प्रत्येकाची सखोल चौकशी करूनच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाविद्यालयाने केलेल्या चौकशीच्या गोपनीय अहवालात संपूर्ण घटनाक्रम दिला असून, कारवाई करण्यासाठी हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर चिपळूणकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात विविध चर्चांना ऊत आला होता. परराज्यातून आलेल्या एका विद्यार्थ्याने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला. त्यामुळे अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बाहेरील पर्यवेक्षकाने केली कारवाई - परीक्षा घेण्यासाठी दोन पर्यवेक्षक दुसर्‍या महाविद्यालयांतून पाचारण केलेले असतात. केसीई सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही कुसुंबा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा.डॉ.उमेश वाणी व बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.आय.डी.पाटील यांनी कारवाई केली असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
दोन समित्यांची स्थापना - 23 मे रोजी घडलेल्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अवघ्या 14 दिवसांत दोन समित्यांची स्थापना करण्यात आली होती. 30 मे रोजी महाविद्यालयाने समिती गठीत केली होती. दोन दिवस चौकशी करून सदर समितीने 1 जून रोजी विद्यापीठास गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर 3 जून रोजी सत्यशोधन समिती गठीत केली होती. त्यात विद्यापीठातील प्राध्यापक व कायदा अधिकारी यांचा समावेश होता. त्यानंतर 5 जून रोजी गुन्हा दाखल करून पोलिसांकडे कारवाईची सूत्रे देण्यात आली आहेत.
14 दिवसांचा घटनाक्रम
23 मे : प्रतीक मारडिया या विद्यार्थ्याच्या एकाच क्रमांकाच्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. पर्यवेक्षकांकडून कॉपी केस, प्राचार्य डॉ.चिपळूणकर यांची कॉपी केसच्या अहवालावर स्वाक्षरी.
24 मे : फेरफार केलेल्या दोन्ही उत्तरपत्रिकांसह इतर सर्व उत्तरपत्रिका विद्यापीठात जमा.
26 मे : वर्गावर असलेले पर्यवेक्षक, कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.
30 मे : सायंकाळी 4 वाजता विद्यापीठाने पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाकडून चौकशी समिती गठीत.
1 जून : महाविद्यालयाने चौकशी केलेला गोपनीय अहवाल विद्यापीठास सादर केला.
3 जून : विद्यापीठाकडून सत्यशोधन समितीचे गठन, समितीकडून महाविद्यालयात जाऊन चौकशी.
4 जून : संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून महाविद्यालयास पत्र.
5 जून : संबंधित प्राध्यापकासह सहा जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.