आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दुचाकी पार्क करून वर्गाकडे जात असताना महाविद्यालयाच्या आवारात चक्कर येऊन डोक्यावर पडल्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर दुखापत झाली होती. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे चक्कर येऊन त्याचा तोल गेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर महाविद्यालयास सुटी देण्यात आली. मृत्यू पश्चात त्याचे नेत्रदान करण्यात आले आहे. गुणवान तरुण विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
शुभम सुनील गुरव (वय २३, रा.श्रीधरनगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. विद्यार्थी प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयात दुचाकीवर आला होता. दुचाकी पार्क केल्यानंतर पार्किंगमधून महाविद्यालयात प्रवेश करत असताना सकाळी १० वाजता त्याला अचानक चक्कर आली. तोल जाऊन तो मागे असलेल्या दगडांवर कोसळला. त्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजूला जबर दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक घटनास्थळी जमा झाले. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शुभमचे वडील सुनील गुरव यांच्याशी तत्काळ संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी शुभमला डॉ.राजेश जैन यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची विनंती प्राध्यापकांना केली. त्यानुसार प्रा.आर.के.तिवारी, प्रा.एस.एन.पवार यांच्यासह विद्यार्थ्यांनी जखमी शुभमला महाविद्यालयाच्या कारमध्ये डॉ.जैन यांच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले. तोपर्यंत त्याची आई अर्चना वडील सुनील गुरवही रुग्णालयात आले होते. 
 
रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी शुभमचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूबाबत कळताच अर्चना सुनील गुरव यांनी रुग्णालयात आक्रोश केला. त्याला काही आजार नव्हता. यापूर्वी त्याला चक्कर येण्याचा त्रासही झालेला नव्हता. तब्येतही सुदृढ होती. तरण्याताठ्या मुलाच्या अकाली मृत्यूने आईवडिलांना मोठाच धक्का बसला. शेवटी सुनील गुरव यांनी स्वत:ला सावरत प्रचंड आक्रोश करीत असलेल्या शुभमच्या आईला घरी नेले. या घटनेबाबत कळताच महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापकांनी डॉ.राजेश जैन यांच्या रुग्णालयात धाव घेतली. एम.जे.महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारीही रुग्णालयात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट हे सुद्धा रुग्णालयात आले होते. 
 
रिचेकिंगमध्ये वाढून आले होते एका विषयाचे गुण 
शुभमहा रायसोनी महाविद्यालयाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा तिसऱ्या वर्षाचा टॉपर विद्यार्थी होता. एका विषयात कमी गुण मिळाल्याची शंका आल्याने त्याने पेपर रिचेकिंगसाठी अर्ज दिला होता. त्या विषयातही त्याचे गुण वाढून आले होते. त्याच्या अकाली मृत्यूमुळे महाविद्यालयाने एक गुणवान विद्यार्थी गमावला आहे. त्याने भविष्यात महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल केले असते, अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भट प्रा. तिवारी यांनी व्यक्त केली. 
 
योग शिक्षकांचे कुटुंब 
शुभमचे वडील सुनील गुरव हे मूळजी जेठा महाविद्यालयात क्लर्क तसेच योगशिक्षक आहेत. त्याची आई अर्चना बहीण नेहा या सुद्धा योगशिक्षिका आहेत. गुरव कुटुंबातील हे तिघे जण योगशिक्षणाचे काम करतात. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. बडोदा येथून शुभमची आत्या आणि नातेवाईक येणार असल्याने त्याच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचा मृतदेह वातानुकूलित शवपेटीत ठेवण्यात आला आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...