आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Medium School Admission Issue In Jalgaon

शासनाचे नियम धाब्यावर; इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नर्सरी पूर्व प्राथमिकची प्रवेशप्रक्रिया एप्रिल-मे महिन्यात घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतरही शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
दरवर्षाप्रमाणे यंदाही या शिक्षण संस्था शासनाच्या आदेशाला ठेंगा दाखवत मनमानी कारभार करत असल्याचा प्रत्यय ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात आला. दरम्यान, प्रवेशाच्या शैक्षणिक शुल्काबाबत विचारणा केल्यावर ‘फोनवर नव्हे, तर प्रत्यक्षात येऊन विचारा’ असे संस्थांतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरवर्षी मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढलेला दिसून येतो. त्यामुळे डिसेंबर-जानेवारी उजाडताच पालकांकडून प्रतिष्ठित िशक्षण संस्थांमध्ये जाऊन प्रवेशप्रक्रियेबाबत विचारणा केली जाते. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी पाल्याच्या प्रवेशाकरिता पालकांचे शहरातील मोठ्या संस्थांमध्ये चकरा मारणे सुरू झाले आहे. त्यामुळे संस्थांमध्येदेखील डिसेंबरपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
शहरात केवळ १० ते १२ संस्थांकडेच पालकांचा ओढा दिसून येत असल्याने या संस्थांचेही फावते. वास्तविक पूर्व प्राथमिकसह अन्य वर्गांची प्रवेशप्रक्रिया एप्रिल-मे या महिन्यात राबवण्यात यावी, असे शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाची सर्रास पायमल्ली केली जात आहे. शाळांमधील प्रवेशाबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन आणि फोनवरून माहिती घेतली.

अल्पसंख्याक शाळांना सूट
सेंट जोसेफ, सेंट टेरेसा, रुस्तमजी, न्यू इंग्लिश मीडियम या शाळा अल्पसंख्याक असल्यामुळे राज्य शासनाचे आदेश अथवा नियम त्यांना लागू पडत नाही. या शाळांवर थेट सीबीएसई बोर्ड अंकुश ठेवते. त्यामुळे शिक्षण विभागही या शाळांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, इतर संस्थादेखील या शाळांप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया राबवून मोकळ्या होतात.

...तर शाळांची मान्यता काढणार
^शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यातच प्रवेशप्रक्रिया राबवण्याच्या सूचना संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही संस्थांनी प्रवेशाची प्रक्रिया राबवली असेल, तर अशा संस्थांची मान्यतादेखील काढली जाऊ शकते. तेजरावगाडेकर, प्रभारीशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
बीयूएन रायसोनी स्कूल नर्सरीसह इतर वर्गांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. ११ हजार रुपये नर्सरीचे वार्षिक शुल्क आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूल जानेवारीपासून प्रक्रिया सुरू झाली. शैक्षणिक शुल्काविषयी सोमवारी प्रत्यक्ष माहिती देऊ.
रुस्तमजी इंग्लिश स्कूल प्रवेशप्रकिया डिसेंबरपासून सुरू झाली. संबंधित रजेवर असल्याने माहिती सोमवारी मिळेल.
वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूल एप्रिलपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात.
सेंट लॉरेन्स स्कूल अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू झाली नसून, मार्चनंतर सुरू होईल.
ही माहिती आली समोर
डिसेंबरपासूनच पूर्व प्राथमिक वर्गांच्या प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ; जि.प.चा शिक्षण विभाग मात्र ढिम्म!
निम्मे रक्कम भरण्याची अट
कुठे नोकरी करतात, पाल्याचे वय किती, राहायला कुठे अादी माहिती विचारूनच या संस्थांतील कर्मचाऱ्यांनी प्रवेशाची माहिती दिली. बहुतेक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांनी नावदेखील सांगितले नाही. तसेच वार्षिक शुल्काची निम्मे रक्कम प्रवेशावेळी भरण्याची अट बहुतेक संस्थांनी घातली. मात्र, काही संस्थांनी फोनवरून माहिती देण्यास नकार देत शुल्काविषयीची माहिती प्रत्यक्ष शाळेत येऊनच विचारा, असे सांगितले.