आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकाने केले 2 ठिकाणांवर अतिक्रमण, म्युनिसीपल संकुलावरच थाटले पत्र्यांचे शेड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युनिसीपल संकुलाच्या गच्चीवर थाटण्यात आलेले अतिक्रमित शेड. - Divya Marathi
म्युनिसीपल संकुलाच्या गच्चीवर थाटण्यात आलेले अतिक्रमित शेड.
भुसावळ- शहरात गेल्या काळात अतिक्रमणाला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपची पालिकेवर बहुमताने सत्ता आल्यानंतरही शहरातील अतिक्रमणांचा सपाटा सुरुच आहे. आता तर सत्ताधारी भाजपच्या एका ज्येष्ठ नगररसेवकाने शहरातील म्युनिसीपल संकुल आणि तार ऑफिस रोडवरील पंचवटी गौरव हॉटेलजवळ अतिक्रमण थाटण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कारवाईसाठी प्रशासनाने मात्र डोळेझाक केली आहे.
 
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न आता नवीन राहिला नाही. सत्तेच्या जोरावर अतिक्रमण थाटण्याचे प्रकार गेल्या काळापासून वाढले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकानेही अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. मुख्य बाजारपेठेतील म्युनिसीपल मार्केटच्या दुसऱ्या माळ्यावर हॉटेल महाराजाच्या शेजारील गच्चीवर टिनपत्रे टाकून अतिक्रमण थाटण्यात आले आहे. भविष्यात या जागेवर बियर शॉपी टाकण्याचे नियोजन केले जात आहे. यासह तार ऑफिस रोडवरील हॉटेल पंचवटी गौरव जवळील मोकळ्या जागेत अतिक्रमण थाटले आहे. यापूर्वीही याच जागेवर बांधकाम करुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मात्र यावेळी शहरात ओरड वाढल्याने हा प्रकार थांबला. मात्र आता पालिकेवर सत्ता येताच पुन्हा या नगरसेवकाने टिनपत्रे टाकून अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. शहरातील गर्ल्स हायस्कूलजवळ गेल्या दीड वर्षांपूर्वी अतिक्रमण थाटले जात असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र आता सत्तेत असतानाही अतिक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याची बाब गांभीर्याने समोर आली आहे.
 
अपात्रतेची तक्रार होणार : शहरातीलम्युनिसीपल मार्केटची गच्ची, तार ऑफीसरोडवरील मोकळ्या जागेत केलेल्या अतिक्रमणासंदर्भात जनआधार विकास पार्टीतर्फे संबंधित नगरसेवकाच्या अपात्रतेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे.
 
अतिक्रमण नष्ट करू
शहरातील व्यापारी संकुल, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाबाबत सर्वेक्षण करुन अहवाल मागवणार आहे. आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या मोहीमेत सर्व अतिक्रमणे नष्ट केली जातील. आपल्या काळात तरी शहरात कोठेही अनधिकृतपणे अतिक्रमण होऊ देणार नाही. कडक कारवाई होणारच आहे, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.
 
इतर प्रकार चव्हाट्यावर
गेल्या महिनाभराच्या काळात पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाच्या उत्तरेकडील भागात टिनपत्रे टाकून मोकळ्या जागेवर चार दुकाने टाकण्यात आली आहेत. यासह म्युनिसीपल मार्केटमध्ये दोन ठिकाणी कोपऱ्याच्या भागांमध्ये पत्र्यांच्या टपऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...