आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्परिणाम: आशियातील पक्ष्यांवर हवामान बदलाचे संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- हवामानातील बदल मानवाला भेडसावत असले तरी त्याचे दुष्परिणाम पक्ष्यांवर सर्वात आधी होणार असल्याचे एका अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

यूकेमधील डरहॅम विद्यापीठ आणि बर्डलाइफ इंटरनॅशनल (भारतातील संलग्न संस्था ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’- बीएनएचएस) या संस्थेने आशियातील केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की, महत्त्वाच्या आणि संरक्षित स्थळांचे वाढीव संरक्षणच पुरेसे नाही, तर विस्तीर्ण प्रदेशांचे चांगले व्यवस्थापनही गरजेचे आहे. काही ठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत पक्षी जगवण्यासाठी त्यांना अनुकूल हवामान असलेल्या प्रदेशात हलवण्याचीही निकडही व्यक्त करण्यात आली आहे.

आशियाई पक्षी व त्यांचे अधिवास धोक्यात : हिमालयाचा पूर्व भाग ते आग्नेय आशियातील निम्न मेकाँग नदीपात्राच्या परिसरातील पक्ष्यांच्या 370 प्रजातींचा अभ्यास करून ज्या अभयारण्यांमध्ये व आयबीएसारख्या (इम्पॉरटंट बर्ड एरिया) संरक्षित भागांमध्ये पक्ष्यांना अनुकूल वातावरण आहे तेथे त्यांचे स्थलंतरण करता येईल का याची चाचपणी या संशोधनात केली आहे.

‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात भूतान, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम व भारताच्या काही भागासह नेपाळचा समावेश होता. निम्न मेकाँग क्षेत्रातील आयबीएवर पूर्व हिमालयापेक्षा जास्त दुष्परिणाम झालेले आहेत. येथे पक्षीसंख्येवर परिणाम होईल, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतातील स्थिती
भारतात विकासाचा प्रचंड दबाव आणि समृद्ध जैवविविधता यांना एकाच भूभागाचा वापर करावा लागत आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक जैवविविधता,अधिवास टिकवायचे असतील तर येथे सर्वंकष विकासाचे प्रारूप विकसित करावे लागेल.

भारतात 466 आयबीए
भारतात आतापर्यंत 466 आयबीएंची नोंद करण्यात आली आहे. अनेक असंरक्षित जंगले, कुरणे आणि पाणथळ जागा आयबीए आहेत किंवा त्यांच्यात तशी क्षमता आहे, असे बीएनएचएसने आयबीए निकषांनुसार केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.’’ अतुल साठे, व्यवस्थापक-संवाद, बीएनएचएस