आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everyday 500 Banana Truck Departed To The North India

जळगावमधून उत्तर भारतातील बाजारपेठेत रोज 500 ट्रक केळीची रवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - रमजानमुळे बाजारपेठेतील केळीची मागणी वाढली असली तरी आवक कमी झाल्याने भाव स्थिर आहेत. सध्या सावदा आणि रावेर येथून दररोज सरासरी 500 ट्रक भरून केळी उत्तर भारतातील बाजारपेठेत रवाना होते. याशिवाय तीन दिवसाआड बीसीएन, हॉर्टिकल्चर ट्रेन निंभोरा, सावदा, रावेर परिसरातून रवाना होते.

कधीकाळी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील बाजारपेठेत हुकमी एक्का असलेली खान्देशी केळी मिळवण्यासाठी व्यापार्‍यांना तळ ठोकून प्रतीक्षा करावी लागायची. आता मात्र ट्रान्सपोर्ट खर्च, वाहतूक अंतराचा सारासार विचार करून गुजरात व आंध्र प्रदेशच्या केळीने खान्देशला मागे टाकले आहे. सध्या रमजान महिना सुरू असला तरी केळीला अपेक्षित उठाव नसला तरी गेल्या पंधरवड्यापासून चित्र बदलायला सुरूवात झाली आहे.

10 जुलैला चांगल्या केळीला 650 व 16 रुपये फरक, मध्यमला 525 व 12 चा फरक असा भाव मिळाला. यानंतर 11 जुलैला प्रतिक्विंटल 25 रुपये वाढले. 14 आणि 15 जुलैला चांगली आणि मध्यम दर्जाच्या केळीचे भाव पुन्हा 25 रुपयांनी घसरले. मध्यम दर्जाची केळी 500 व 12 रुपये फरकांपर्यंत आली. 20 जुलैला काहीसे चित्र बदलले. भावात प्रतिक्विंटल 25 रुपये वाढ झाली. 21 आणि 22 जुलैला पुन्हा 25 रुपये वाढल्याने चांगल्या केळीला 700 व 16 रुपये फरक असा भाव मिळाला. मध्यम दर्जाची केळी 575 आणि 12 रुपये फरकांपर्यंत आली. 23 जुलैला प्रत्येकी क्विंटलमागे 50 रुपये वाढ झाल्याने शेतकर्‍यांचा चेहरा खुलला.

उशीर झाल्यास नुकसान होते
दिल्ली आणि पाकिस्तानच्या बाजारपेठेत गुजरातच्या केळीने आपल्या खान्देशी केळीला मागे टाकले आहे. तरीही सावद्याहून दररोज 150 ते 200 ट्रकभरून केळी दिल्लीकडे पाठवणे सुरू आहे. मात्र, ट्रकला बाजारपेठेत पोहोचण्यास उशीर झाल्यास केळी रस्त्यात पिकून मोठे नुकसान होते. महेश लेखवाणी, केळी व्यापारी, सावदा

भाववाढ शक्य
केळी निर्यातीसाठी बीसीएन, हॉर्टिकल्चर ट्रेनचा तीन-चार दिवसांआड वापर सुरू आहे. रमजानमध्ये मागणी वाढलेली नाही. मात्र, आगामी र्शावण महिना आणि सणावारात ती वाढेल, असा अंदाज आहे. मागणी वाढल्यास निश्चितच भावही वाढणार आहेत. मोहन पाटील, शेतकरी, तांदलवाडी ता.रावेर

एकट्या रावेरातून 300 ट्रक
रावेर, सावदा आणि निंभोरा मालधक्क्य़ांवरून बीसीएन व रावेरच्या मालधक्क्य़ांवरून हॉर्टिकल्चर ट्रेन तीन-चार दिवसांआड दिल्लीकडे धावते. याशिवाय सावद्याहून सरासरी 200 आणि रावेरहून 300 अशी तब्बल 500 ट्रक केळी उत्तर भारतातील बाजारपेठेत रवाना होते. रमजानसोबतच र्शावण महिना आणि रक्षाबंधनामुळे केळीची मागणी आणि भाव वाढण्याची शक्यता आहे.