आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्ञानेश्वरी प्रत्येकाने वाचायला हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्रात जन्माला आल्यावर मिसळ आणि वडापाव खाल्ला नाही तर आयुष्य न जगल्यासारखे होते. तसेच महाराष्ट्रात जन्माला आल्यावर ज्ञानेश्वरी ज्या व्यक्तीने वाचली नाही त्याचे आयुष्य सार्थकी लागत नाही, असे प्रतिपादन पुणे येथील विभागीय उपायुक्त इंद्रजित देशमुख यांनी केले.

दीपस्तंभ फाउंडेशन आणि प्रति पद्मालय गणेश देवस्थान यांच्यातर्फे शनिवारी ‘तरुणांसाठी ज्ञानेश्वरी’ याविषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

जनार्दन महाराज म्हणाले, की माणसाला श्रीमंती ही विचार, चारित्र्य, स्वभाव याची असायला हवी. या कार्यक्रमातून विचारांचे धन मिळणार आहे. ज्ञानेश्वरांना त्यांच्या विचारांनी मोठे केले आहे. आपली संस्कृतीदेखील चारित्र्य आणि संस्कारांचे पूजन करते हे संस्कार प्रत्येक तरुणात असायला हवे. आपले पाय देखील आपल्याला खूप काही शिकवून जातात. पुढे असणार्‍याला गर्व नसतो आणि मागे असणार्‍यास दु:ख नसते. कारण त्यांना माहीत असते की, आपली वेळ येणार आहे, असे सकारात्मक विचार ठेवावे.

चिमुकल्यांनी वारकरी दिंडीचे दर्शन घडवत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पालखी काढली. या वेळी आषाढी एकादशीच्या पायी वारीची चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. या वेळी विद्यार्थी आणि पालकांसाठी असणार्‍या ‘आत्मविश्वास व प्रेरणा अभियान’ या पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. महामंडलेश्वर जनार्दन महाराज, नामदेव महाराज (रवंजेकर), यजुर्वेंद्र महाजन, प्रा. सुरेश पांडे, सचिन नारळे, पी.एस.जाधव, प्रा. सी.एस.पाटील, अमोल भोळे उपस्थित होते. जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन, तर रेखा महाजन यांनी आभार मानले.

विशीत वाचावी ज्ञानेश्वरी
तरुण वयात ज्ञानेश्वरी वाचणे आजकाल दुर्मीळ आहे. 80 वर्षांचे आजोबा ज्ञानेश्वरी वाचतात. त्या वेळी त्यांचा नातू जवळ आल्यावर ते त्याला व्यवस्थितरीत्या ओळखू शकत नाहीत, अशा वयात त्यांना ज्ञानेश्वरी किती लक्षात राहील आणि कितपत ती अंमलात येईल? ज्या वयात ज्ञानेश्वरांनी ती लिहिली त्याच वयात तरुणांनीदेखील ती वाचणे आवश्यक आहे. 16व्या वर्षी त्यांनी लिहिली तरुणांनी निदान विशीत ती वाचावी, म्हणजे पंचविशीपर्यंत आपण आपल्या कार्यात त्याची अंमलबजावणी करू. ज्ञानेश्वरांनी 56 भाषांमधील विखुरलेले ज्ञान आपल्याला दिले आहे, असे इंद्रजित देशमुख यांनी सांगितले.