आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex MLA Santosh Chaudhari Provided To VIP Service Bye Jalgaon Police

खंडणी प्रकरणी अटकेतील माजी आमदार संतोष चौधरींना पोलिसांची \'सेवा\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळच्या बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार संतोष चौधरीची पोलिसांकडून चांगलीच बडदास्त राखली जात आहे. सोमवारी ही खातिरदारी ‘दिव्य मराठी’ने नेमकी टिपली. त्याची आता खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे.

सोमवारी चौधरीला नियमित सुनावणीसाठी सकाळी 11 वाजता न्यायालयात नेण्यासाठी एक हवालदार व दोन पोलिस कर्मचारी असे तीन जण कारागृहात दाखल झाले. कारागृहातून आरोपीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एक पांढरी स्वीप्ट डिझायर कार (एमएच19 बीजे8880)तेथे दाखल झाली. त्या तिघा पोलिस कर्मचार्‍यांसह चौधरी कारमध्ये बसले व कार न्यायालयाकडे रवाना झाली. सुनावणी लवकर आटोपल्याने आरोपीला पुन्हा कारने कारागृहात आणले.

वेअर हाऊसजवळ अर्धा तास गप्पा
आरोपी कारागृह परिसरात आल्यानंतर कारमधून उतरून आत न जाता ती कार लागूनच असलेल्या वेअर हाऊसकडे नेण्यात आली. या निर्जनस्थळी आरोपीची कार उभी राहताच कारमधून तिघे पोलिस कर्मचारी खाली उतरले. आरोपी मात्र कारमध्येच बसून होता. जवळ जवळ 20 ते 25 मिनिटे ही कार त्या ठिकाणी थांबून होती. पोलिस कर्मचारी मात्र आरोपीला शासनाने झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, अशा आविर्भावात हातात शस्त्रे घेऊन ‘बंदोबस्ताला’उभे होते. आरोपी कारमध्ये काय करतोय, मोबाइलवर बोलतोय की काय, हे पाहण्याचे साधे कर्तव्यदेखील तिघा कर्मचार्‍यांनी बजावले नाही. सामान्य आरोपींना एक आणि मोठय़ांना वेगळा न्याय मिळत असल्याने कारागृहातील कारभारावर यापूर्वीही ताशेरे ओढले गेले आहेत. आता पुन्हा तिच री ओढली जात आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
आरोपी संतोष चौधरी याला पोलिस संरक्षणात न्यायालयात नेण्यासाठी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक व दोन कर्मचारी नेमण्यात आले होते. या आरोपीला इतर आरोपींसोबत कारागृहात नेण्यासाठी स्वतंत्र पोलिस गाडी आलेली असतानाही या कर्मचार्‍यांनी त्यास त्याच्या खासगी कारमधून नेले. आरोपी खासगी बोलत असताना त्याच्या बोलण्याला न थांबविता उलट त्याला अभय दिले. आरोपी अरेरावीने वागत असताना त्याला हटकण्याचे कोणतेही कष्ट न घेता फक्त गंमत बघण्याचे कर्तव्य पोलिसांनी निभावले.

पत्रकारांना पाहताच ‘पळता भुई थोडी’
आरोपी वेअर हाऊसच्या परिसरात कारमध्ये असतानाच त्याचा मुलगा सचिन पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा कारने कारागृह परिसरात दाखल झाला. चहाच्या टपरीवर उभ्या असलेल्या टपोरींना हाय हॅलो केल्यानंतर तो तेथेच गप्पा मारत उभा राहिला. मात्र, तेवढय़ात आरोपीच्या चालकाला खबरी निखिलने पत्रकार पाळतीवर असल्याची कल्पना दिली. त्यामुळे त्यांची फजिती उडाली. पोलिसांसह चालक कारमध्ये बसला व त्याने कार अत्यंत सुसाट थेट कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली. आरोपी पोलिसांसह खाली उतरला व कारागृहात शिरला.

कर्मचार्‍यांची 100 टक्के चूक
कारागृहातील आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी पोलिस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात येतात. त्याचबरोबर पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभागातून एक मोठी गाडीदेखील देण्यात येते. असे असताना आरोपी संतोष चौधरीला खासगी कारमधून नेण्यात आले. ही बाब चुकीचीच आहे. या प्रकरणात आमच्या कर्मचार्‍यांचीच 100 टक्के चूक आहे. या कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. लवकरच त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात येईल. - -वाय. डी. पाटील, पोलिस उपअधीक्षक ( गृह)

कारवाईच्या हालचाली
पोलिस उपअधीक्षक ( गृह) कार्यालयातून बाहेर पडताना वाय.एस. पाटील
आरोपी संतोष चौधरीच्या बडदास्तीचा प्रकार पोलिस उपअधीक्षक ( गृह) वाय.डी. पाटील यांना समजताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभारी राखीव पोलिस निरीक्षक वाय.एस. पाटील यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर चौधरीच्या सेवेत गुंतलेले मुख्यालयात नेमणूक असलेले कर्मचारी सुरेश भदाणे (सहा. पोलिस उपनिरीक्षक), विष्णू भील, मेहरबान तडवी यांचीही चौकशी केली. पाटील यांनी हा प्रकार बाहेरगावी गेलेल्या अधीक्षकांच्या कानावर घातला. याप्रकरणी थेट कारवाईचे अधिकार अधीक्षकांनाच आहेत. सोमवारी दिवसभर पोलिस मुख्यालयात तिघा कर्मचार्‍यांकडून आरोपीच्या बडदास्तीची चर्चा चघळली जात होती. कर्तव्य विसरून आरोपींसमोर नतमस्तक होणे कुणालाही रुचलेले नाही.