आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांना मिळणार महागड्या तपासण्या स्वस्तात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा रुग्णालयातील सुविधांबाबतच्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील 19 ठिकाणी रुग्णांच्या विविध तपासण्या करण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे सीटीस्कॅन, इएमआरआयसारख्या महागड्या तपासण्याही अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत. जिल्हा रुग्णालयात या कामास 10 तारखेपासून सुरुवात होत आहे. या तपासण्यांसाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री व इन्फ्रास्ट्रर पूर्णपणे तयार असून जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र इमारतीचे कामदेखील पूर्णत्वास आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयातील सुविधा, उपचार आणि तपासण्यांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे वगळता नाशिक जिल्हा व मालेगाव उपजिल्हा रुग्णालयासह जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पायलट प्रोजेक्टनंतर संपूर्ण राज्यभर टप्प्याटप्याने हा प्रकल्प राबविला जात आहे. या सुविधेमुळे दर्जेदार तपासण्या होऊन तपासणीचे अहवालही वेळेत मिळणार आहेत. त्या बरोबरच गंभीर असलेल्या रुग्णावर तातडीने योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे. या योजनेत दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबीयांना मोफत, ज्येष्ठ नागरिकांना 50 ते 60 टक्क्यांपर्यंत शुल्कात सूट देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयात एक्सरे, सीटीस्कॅन, सोनोग्राफी, इसीजी डिजिटल डिजिटल एक्सरे बरोबरच इएमआरआयसारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत. ही योजना सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकासाठी आहे.


दरातील तफावत अशी
तपासण्या जिल्हा रुग्णालय खासगी रुग्णालय
एक्सरे 30 रुपये 200 ते 400 रुपये
ईएमआरआय 2000 ते 4000 6000 ते 8000 रुपये
सिटीस्कॅन 500 ते 1200 2000 ते 2200 रुपये
सोनोग्राफी 50 ते 600 1200 ते 2000 रुपये


10 जूनपासून काम सुरू
शासनाने ही आरोग्य सेवा पुरविण्याचे काम विप्रो या खासगी कंपनीकडे सोपविलेले आहे. या कंपनीला जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाच हजार स्क्वेअर फूट बांधलेली जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर वीजपुरवठय़ाची सुविधादेखील पुरविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या शल्यचिकित्सकांच्या दालनाच्या मागील बाजूस होत असलेल्या नवीन इमारतीत ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाले असून अत्यंत प्रशस्त अशा या इमारतीत विप्रो कंपनी आपल्या खर्चाने मशिनरी बसविणार आहे. 10 जूनपासून हे काम सुरू होणार आहे. पहिला आठवडा मशिनरी बसविण्यात जाणार आहे. त्यानंतर लागलीच तपासण्यांना सुरुवात होणार आहे. या तपासण्याच्या सवलतीचा सर्वसामान्यांसह श्रीमतांना देखील फायदा होणार आहे.