जळगाव- कुंभमेळ्याच्यापार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नाशिकरोड या मार्गावर आठ डब्यांची (लोकलसदृश) लहान रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भुसावळ विभागातील १६ तर नागपूर विभागातील १० असे २६ लोको पायलटना बडोदा येथे प्रशिक्षण दिले जात आहे.
भुसावळ मध्य रेल्वे विभागातून १८ दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी २६ लोको पायलट १२ ऑगस्टला रवाना झाले होते. यानंतर १४ ऑगस्टपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोको पायलटना दोन आठवड्यांचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. यानंतर गाडी सुरू होणे शक्य आहे.
पुष्करराजमेळ्यात झाला गाड्यांचा वापर
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् येथे झालेल्या पुष्करराज मेळ्यातही या रेल्वेगाड्यांचा वापर करण्यात आला होता. तेथूनच प्रत्येकी आठ डब्यांच्या दोन गाड्या भुसावळात दाखल झाल्या.
भुसावळच्या यार्डात आलेली आठ डब्यांची विशेष रेल्वेगाडी.
सीआरएसकडे प्रस्ताव
सीआरएस(कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी) यांनी परवानगी दिल्यानंतर या गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे सीआरएस यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर गाड्यांना हिरवी झेंडी मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना दिली.