आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: नेत्रदानाची ध्वनीचित्रफीत गणेश मंडळांजवळ दाखवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- उपज, ग्रीन अर्थ फाउंडेशन, क्रिएटिव्ह आय ग्रुप आणि वन्यजीव संरक्षण संस्थांनी नेत्रदानाच्या जागृतीसाठी उपक्रम हाती घेतलेला आहे. गणेश मंडळांजवळ हैदराबाद येथील आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या जनजागृतीपर ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येत आहेत. पाच मंडळांजवळ या ध्वनीचित्रफिती दाखवल्या जाणार आहे. या उपक्रमात नऊ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.

जळगाव येथील मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयाच्या माध्यमातून जिल्हाभरात नेत्रदान जनजागृती सुरू आहे. शहरातील चार स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग नोंदवला. उपज संस्थेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांत 25 अंधांना दृष्टी मिळाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अंधदोष निवारणासाठी शहरात जनजागृती करण्यात येत आहे. चारही संस्थांनी शहरात उत्तर भागातील दोन गणेश मंडळांजवळ हैदराबाद येथील आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाने निर्मित केलेल्या मराठी भाषेतील जनजागृतीपर लघुपट दाखवला.

यांनी केला संकल्प
उपज आणि सहयोगी संस्थांच्या आवाहनाला साद देत शहरातील मनोज रामास्वामी पुन्नल, पूनम मनोज पुन्नल, सानिका मनोज पुन्नल, चंद्रकांत यशवंत निकम, ज्योती चंद्रकांत निकम, संजय मुरलीधर चौधरी, भावेश संजय चौधरी, सुदीप र्शीकिसनदास राठोड, एकनाथ दामोदर बाऊस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. तर 20 जणांनी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली.

उपक्रमासाठी यांची धडपड
उपजचे सचिव सुरेंद्र चौधरी, ग्रीन अर्थ फाउंडेशनचे प्रा. वसंत खरे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सतीश कांबळे, क्रिएटिव्ह आय ग्रुपचे विवेक वणीकर, प्रा. संजीव पाटील, मिलींद भारंबे, शंभू मेहेंदळे हे जनजागृतीचे काम करीत आहेत. गणेशोत्सवात पाच मंडळांजवळ नेत्रदानाचे लघुपट दाखवण्यात येणार आहे. आगामी काळात या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा मानस या संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.