आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून गटारीत वाहिली हजाराे लिटर दारू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - बनावट मद्याची वाहतूक तस्करीबद्दल कारवाईचे विशेष अधिकार असलेल्या उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी नियम धाब्यावर बसवत हजाराे लिटर दारू गटारीत सोडली. विशेष म्हणजे यामुळे परिसरात मद्याचा उग्र दर्प पसरला. गटारीतून वाहत जाणारे मद्य पुढे थेट परिसरात पाझरत होते. उग्र दर्पामुळे सायंकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून बाहेर पडावे लागले. ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत हा आंधळा कारभार समोर आला.
महापालिका पांझरा नदीपात्रापासून अवघ्या हाकेभराच्या अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या या विभागाजवळ मात्र मंगळवारी दुपारपासून मद्याचे शेकडाे बॉक्स बाहेर काढून गटारीत रिकामे केले जात होते. गोडाऊनमध्ये ठेवलेले बॉक्स खासगी मजुरांमार्फत बाहेर काढले जात होते. त्यासाठी पाच पुरुष चार महिला कामात गुंतल्याचे दिसून आले. प्लास्टिकच्या मोठ्या पोत्यांमध्ये रिकाम्या बाटल्या भरल्या गेल्या. तर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या गटारीजवळ चार महिला आपले आरोग्य धोक्यात घालून मद्याच्या बाटल्या गटारीत रिकाम्या करत होत्या. दुपारपासून सुरू असलेल्या या प्रकारातून हजारो बाटल्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. परिणामी यातून दारू गटारीत सोडण्यात येत होती. विशेष म्हणजे न्यायालयाचा आदेश असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे मात्र या ठिकाणी फिरकले नाहीत. याउलट आपल्या कार्यालयात हास्य-गप्पांमध्ये ते मश्गूल असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत आढळले.

या प्रकारामुळे संपूर्ण प्रशासकीय परिसरात दूरपर्यंत दारूचा उग्र दर्प पसरला होता. याबाबत काही नागरिकांनी स्वत: अधीक्षक डॉ. अंचुळे यांची भेट घेऊन प्रकार निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉ. अंचुळे यांनी भेट नाकारून नागरिकांच्या तक्रारीही कानापर्यंत येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे एरवी गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर कारवाई करणाऱ्या या विभागाची कार्यपद्धतीही तेवढीच विवादास्पद असल्याचे समोर येते. त्यामुळे इतरांवर कारवाईचा विशेष अधिकार असलेल्या या विभागाला वेसण घालेल कोण हाच मुख्य प्रश्न आहे. नियमबाह्य वाहतूक करणारे हे मद्य सुमारे आठ वर्षांपूर्वी जप्त करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाने त्याची विल्हेवाट लावली जात होती. बाजारात त्याची विक्री होऊ नये हा त्यामागील उद्देश होता; परंतु अधीक्षक डॉ. अंचुळे यांच्या दुर्लक्षामुळे या कामगारांपैकी एकाने जरी थोडेफार मद्य दडवले असते तर या हेतूला हरताळ फासला गेला असता.

कारवाई नियमानुसार...
^न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही करण्यात आली. त्यासाठी कोणतीही नियमबाह्य पद्धत अवलंबली नाही. मद्य रिकामे केलेली गटार वाहती नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न उद‌्भवणार नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वत: कर्मचाऱ्यांनी नियमानुरूप कारवाई केली. कर्मचारीही स्वत: घटनास्थळी होते. -एम.एन. कावळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मानवी आरोग्याला प्राधान्य
^मद्याची विल्हेवाटलावताना नियमांचे पूर्णपणे पालन होणे अपेक्षित आहे. विल्हेवाट लावताना त्यातून मानवी आरोग्याला बाधा पाेहाेचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तरीही संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत अधिक सांगू शकतात. मात्र त्यांनी नियम पाळले की नाही, हे पाहिले जाईल. , जिल्हाधिकारी

अधिकारी नव्हते जागेवर...
दहावर्षां पूर्वी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या मद्याची विल्हेवाट लावली जात असताना केवळ मजूर हे काम करताना दिसत होते. उत्पादन शुल्क विभागाचे अिधकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी नव्हते. मुळात जबाबदार अिधकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी हजर राहायला हवे, असा नियम आहे; परंतु तोही पाळला जात नसल्याचे या वेळी केलेल्या पाहणीत दिसून आले.

उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या बाटल्यांमधील मद्य ओतल्यानंतर रिकाम्या बाटल्या एकत्रित करून पोत्यात भरताना मजूर दिसत आहेत.

काय आहेत नियम...
न्यायालयाच्या आदेशानंतर दारूसारखे मादक द्रव्य जमिनीत खोल खड्डा खोदून अथवा वाहणाऱ्या गटारीत सोडून नष्ट करणे गरजेचे आहे. शिवाय ही सर्व प्रक्रिया सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थितीत केली जाते. त्याचे व्हिडिओ शूटिंग करणेही गरजेचे आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून मानवी आरोग्य बाधित होणार नाही याची विशेष काळजी घेणे बंधनकारक असते; परंतु प्रत्यक्षात राज्य उत्पादन शुल्क विभाग याबाबत सुस्त आढळून आला. तर एक, दोन कर्मचारी काही अंतरावर उभे राहून देखरेख करत होते.
बातम्या आणखी आहेत...