आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी नसताना घेतलेली जमिन जप्त करण्याचे तहसीलदारांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शेतकरी असल्याचे खोटे पुरावे सादर करून खरेदी केलेली शेतजमीन शासन दरबारी जमा करण्याचा महत्त्वाचा निकाल यावल तहसीलदार कैलास कडलग यांनी शुक्रवारी सायंकाळी दिला. यावलमधील रहिवासी प्रकाश हरगुणदास बठेजा यांनी डोंगरकठोरा आणि वड्री शिवारात ही जमीन खरेदी केली होती. जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

बठेजा यांनी 21 डिसेंबर 2011 रोजी डोंगरकठोरा (ता.यावल) येथील गट क्रमांक 1673 ही 2.55 हेक्टर जमीन अजिजुद्दीन मसीउद्दीन आणि जैबुद्दीन अजिजुद्दीन यांच्याकडून विकत घेतली होती. ही शेती नावावर करण्यासाठी शेतकरी असल्याच्या पुराव्याची बठेजाने भालोद येथील मंडळाधिकारी ए. जे. पाठक यांच्याकडे मागणी केली. मात्र, पाठक यांनी खोटा पुरावा देण्यास नकार दिला. यानंतर बठेजाने खोटा पुरावा तयार करण्यासाठी वड्री शिवारातील गट क्रमांक 246/1 मधील 0.89 हेक्टर जमीन शांताबाई रतन रुम यांच्याकडून 10 जुलै 2012 रोजी खरेदी केली. यानंतर यावल मंडळाधिकारी एम.एफ.तडवी यांनी बठेजा शेतकरी आहेत किंवा नाही, या पुराव्याची खातरजमा न करताच शेती नावावर लावली.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हा निमंत्रक सुरेश पाटील यांनी माहिती अधिकारातून हा प्रकार समोर आणला. 28 सप्टेंबर 2012 रोजी यावल तहसीलदार कैलास कडलग यांच्याकडे चौकशीची मागणी केली. प्राथमिक चौकशीनंतर कडलग यांनी जानेवारी 2013 मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 84 (क)प्रमाणे दावा चालवून घेतला. बठेजा आणि संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. चौकशीमध्ये बठेजा यांनी त्यांच्याकडील स्वत:ची शेतजमीन 1997 मध्येच विक्री केल्याने ते शेतकरी राहिलेले नव्हते, असे समोर आले. मुंबई कुळवहिवाट अधिनियमाच्या कलम 63 अन्वये बिगर शेतकर्‍यास महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करता येत नाही. या दोन्ही कायद्यांच्या अनुषंगाने तहसीलदार कडलग यांनी बठेजा यांचे शेती खरेदीचे दोन्ही व्यवहार बेकायदेशीर ठरवले. डोंगरकठोरा (ता.यावल) येथील गट क्रमांक 1673 मधील 2.55 हेक्टर क्षेत्र आणि वड्री शिवारातील गट क्रमांक 246/1 मधील 0.89 हेक्टर शेतजमीन शासन जमा करण्याचा निकाल शुक्रवारी सायंकाळी दिला. जिल्ह्यातील या पहिल्याच निकालामुळे खळबळ उडाली आहे. तर तहसीलदारांनी निकालात पारदर्शकता दाखवल्याचे तक्रारदार सुरेश पाटील यांनी सांगितले.

विक्री व्यवहार बेकायदेशीर- शेतकरी असल्याचा खोटा पुरावा तयार करून बठेजा यांनी, वड्री शिवारातील 246/1 मधील 0.89 हेक्टर शेतजमीन 3 नोव्हेंबरला रितेश भोमा कोल्हे (रा.आराधना कॉलनी, भुसावळ) यांनी विक्री केली. मात्र, मुळातच जमिनीची बेकायदेशीर खरेदी केल्याने हा व्यवहारही रद्द ठरवण्यात आला आहे.

जमीन पोलिस पाटलाकडे- बठेजा यांनी नियमबाह्य खरेदी केलेली शेतजमीन शासन जमा करण्यात आली आहे. याबाबत तलाठय़ांना लेखी सूचना देऊन त्या-त्या क्षेत्रावरील पिकाची पाहणी होईल. पुढील प्रक्रिया होईपर्यत शेतजमीन पोलिस पाटलाच्या ताब्यात असेल. - कैलास कडलग, तहसीलदार, यावल