आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट सिमकार्ड गुन्ह्यासाठी वापरणारी टोळी उघडकीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निर्घृण हत्या झालेल्या शाहरुख पटेलच्या खुन्यांचा तपास करताना बनावट नावाने मोबाइलचे सीमकार्ड विकत घेऊन त्या आधारे गुन्हे करणारी मोठी टोळीच पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ज्या मोबाइल क्रमांकावरून शाहरुख पटेलला बोलावून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, तो मोबाइल क्रमांक शहरातील शाहूनगर परिसरात राहाणार्‍या एका बटाटे व्यापार्‍याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शाहरुखच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अजूनही पूर्ण यश आलेले नाही. मात्र, ज्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून शाहरुखला बोलावण्यात आले होते त्या क्रमांकाच्या मालकापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. शाहूनगर परिसरात राहाणारा बटाटे व्यापारी आसिफ शेख याच्या नावावर ते सिमकार्ड असून त्यावरून शाहरुखला एकमेव कॉल करण्यात आला होता. त्यानंतर ते कार्ड बंद आहे. पोलिसांनी आसिफ शेखची चौकशी सुरू केली, वर्षभरापूर्वी हरवलेल्या कागदपत्रांच्या आधारे कोणी तरी हे सिमकार्ड विकत घेतल्याचा दावा या व्यापार्‍याने केला आहे.
गुंता वाढत चालला
दरम्यान, पोलिसांची तपासाची चक्रे वेगात फिरत असली तरी रोज नवी माहिती समोर येत नसल्याने तपासातला गुंता वाढत चालला आहे. शाहरुखला फोन करणार्‍या सिमकार्डधारकाचा तपास लागल्यावर तपास सोपा होईल, असे पोलिसांना वाटत होते. मात्र, हे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगळ्याच व्यक्तीने खरेदी केले असल्याचे प्राथमिक चित्र तयार झाले आहे. आतापर्यंत पोलिसांनी ज्या तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून मिळणारी माहितीही पोलिसांसमोरचा गुंता वाढवत चालली असल्याचे तपासकार्यातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
दुर्लक्ष महागात पडणार
दरम्यान, संबंधित सिमकार्ड आपण विकत घेतलेलेच नाही, असे आसिफ खान सांगतो आहे. त्याचे म्हणणे खरे असेल तर हरवलेल्या कागदपत्रांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते हे त्याला समजणार आहे. गेल्या वर्षी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत वीज जुळणीचे नूतनीकरण करण्यासाठी पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रे नेत असताना ती हरवली होती. त्यासंदर्भात कोणतीही तक्रार न करता आपण डुप्लिकेट कागदपत्रे बनवून घेतली होती, असे शेखचे म्हणणे आहे. महत्त्वाची कागदपत्रे हरविणे सहजपणे घेणे किती धोकादायक असू शकते हे आसिफच्या म्हणण्यावरून स्पष्ट होते. त्यामुळे पॅनकार्ड हरवले तरी पोलिसात तक्रार करणे किती आवश्यक आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.
पाच संशयितांची चौकशी सुरू
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पाचोरा आणि जळगावातून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 10 पेक्षा जास्त युवक आणि तीन मुलींची चौकशी करण्यात आली.