आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळांची चारसौबिसी! दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिळाला दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यात विवाहितांकडून छळाचे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. गेल्या वर्षभरात जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यात महिलांच्या छळाचे एकूण 420 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 239 गुन्ह्यांमध्ये विवाहित महिलांनी आपल्यासोबत न राहणार्‍या सासू-सासर्‍यांची नावे फिर्यादीत लिहून त्यांना खटल्यात गुंतविले आहे. मुलासोबत न राहूनही सूनेच्या तक्रारीला बळी पडलेल्या अशा वृद्ध जोडप्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निवाड्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या निकालात मुले-सुनांपासून वेगळे राहणार्‍या सासू-सासर्‍यांवर कौटुंबिक छळाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात कौटुंबिक छळाच्या खटल्यांची संख्या अधिक आहे. पती- प}ीत झालेल्या भांडणानंतर त्यात तोडगा निघण्यापेक्षा थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. सुमारे 90 टक्के गुन्ह्यांमध्ये सासू-सासर्‍यांना विनाकारण आरोपी बनविले जात आहे. सासू-सासर्‍यांबरोबरच दीर, जेठ व नणंद यांची नावे गोवण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षभरात 97 गुन्ह्यांमध्ये नणंद व जेठ, दीर यांना आरोपी करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल करण्याची पद्धत
एखाद्या विवाहितेला तिच्या पतीकडून लग्नानंतर त्रास दिला जात असेल तर अशा महिला पोलिस ठाण्यात छळाची तक्रार घेऊन जातात. स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी अशा महिलांना जिल्ह्याच्या ठिकाणावर असलेल्या महिला दक्षता समितीच्या कार्यालयात अर्ज करणार्‍यास सांगतात. महिला दक्षता समितीच्या कार्यालयात अर्ज केल्यानंतर संबंधित महिलेला सुनावणीची तारीख दिली जाते. सुनावणीच्या तारखेच्या दिवशी त्या महिलेला दक्षता समितीच्या कार्यालयात बोलावले जाते. त्या महिलेसोबतच तिच्या पतीस देखील बोलावण्यात येते. दोघांना समोर बसवून सुनावणी घेण्यात येते. या सुनावणीत तोडगा काढण्याचा प्रय} केला जातो. मात्र, तोडगा निघत नसेल किंवा विवाहिता नांदण्यास जाण्यास तयार नसेल व तिचा पतीदेखील तिला नांदवायला तयार नसेल अशा वेळी त्या दोघांचा व नातेवाइकांचा जबाब लिहून घेतला जातो.

जेठ, दिराचाही समावेश
जानेवारी 2013 ते एप्रिल 2013 या चार महिन्यात विवाहितेच्या छळाचे एकूण 98 गुन्हे जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये सासू-सासरे यांना आरोपी करण्यात आले आहे. यातील काही गुन्ह्यात जेठ, दीर, नणंद यांनादेखील आरोपी करण्यात आलेले आहे. विवाहित महिलेचा कोणत्याही कारणावरून मृत्यू झाल्यास तिचे नातेवाइक शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त होतात. त्यात त्रास द्यावा म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांची नावेही घेतली जातात.

महिला दक्षता समितीकडून सुरूवातीला होतो तडजोडीचा प्रयत्न
एका पत्रावर गुन्हा दाखल
महिला दक्षता समितीत प्रकरण आल्यानंतर समुपदेशन करूनदेखील तोडगा निघत नसल्यास महिला दक्षता समितीच्या कार्यालयातून संबंधित पोलिस ठाण्यास एक पत्र पाठविण्यात येते. या पत्राची दखल घेत लागलीच त्या पोलिस ठाण्यात 498 चा गुन्हा दाखल करून घेण्यात येतो. विवाहितेचा शारीरिक किंवा मानसिक छळ झालेला असेल तर नुसता 498 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र तिच्या जीवितास धोका निर्माण होईल असे काही घडलेले असेल तर मात्र गुन्ह्याचे स्वरूप पाहून कलमे लावण्यात येतात.

चार महिन्यात 98 गुन्हे
सन 2013 या वर्षात चार महिन्यांत महिलांच्या छळप्रकरणी जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 98 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सुमारे 90 टक्के गुन्ह्यांमध्ये सासू-सासर्‍यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश जण मुले-सुनांजवळ राहत नाहीत.