आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्रजी येणाऱ्याला ज्ञानी समजणे ही समाजातील अंधश्रद्धाच, नेमाडेंचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजी शिकलो म्हणजे जगाचं सर्व ज्ञान प्राप्त होते, असे मानने हीदेखील एक अंधश्रद्धा आहे. डॉ. दाभोलकर राहिले असते तर त्यांना त्यांच्या यादीत हा विषय घेण्याचा मी आग्रह धरला असता, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी शाळेचा आग्रह धरणाऱ्या पालकांना सुनावले.
परिवर्तन नाट्य संस्थेतर्फे बुधवारी डॉ. नेमाडे यांच्या वाढदिवसाचे अाैचित्य साधून त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात अाली. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी समाजमनातील विविध प्रश्न विचारून त्यांना बोलतं केलं. नेमाडेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.
‘इंग्रजी शाळेपेक्षा मराठीतच शिकण्याचा आग्रह का?’ या प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणाले की, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असे जे स्तोम भारतात माजवले जात आहे ते चुकीचे आहे. जगात इंग्रजीला कुणीच विचारत नाही. अनेक देश आपल्याच मातृभाषेचा आग्रह धरतात. सर्वच विदेशी नागरिकांना कुठे इंग्रजी बोलता येते. मराठीतून शिकलेले लोक मुंबई विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. इंग्रजी भाषा आली म्हणजे सर्वच ज्ञान प्राप्त झाले ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
असा नवरा असावा, पण...
सौ. नेमाडेही कार्यक्रमास उपस्थित होत्या. शंभू पाटील यांनी त्यांनाही मििष्कलपणे एक प्रश्न केला की, ‘तुम्हाला नवरा म्हणून डॉ, नेमाडेंबद्दल या क्षणाला काय वाटते?’ यावर त्या म्हणाल्या, की डॉ. भालचंद्र हे बाहेर आहेत तसेच घरात आहेत. नवरा म्हणून चांगले आहेत, पण लेखक म्हणून नको असल्याचे स्पष्ट मत त्यांनी नाेंदवले. त्यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मराठी प्राचीन भाषा
लिळा चरित्र व ज्ञानेश्वरीच्या आधीची मराठी भाषा आहे. खान्देश हा पूर्वीचा कान्हाचा देश म्हणून ओळखला जायचा. या भागातील दोन हजार वर्षांपूर्वीचं साहित्य, ओव्या मराठी भाषेचा इतिहास सांगतात, असे नेमाडे म्हणाले.
धर्मामुळे देशाचे नुकसान
"जाती व्यवस्था आणि जातीवाद' या गंभीर विषयावर बोलताना डाॅ. नेमाडे म्हणाले, या दाेन्ही गाेष्टींमध्ये मोठा फरक आहे. व्यवस्था ही काही विषम, सम यातून सुरू होते. जातीयता ही तिरस्कारातून येते. हिंदू धर्मात जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्था होती म्हणून सर्व व्यवस्थित होते. तो समाजाचा पायाच आहे. हिंदू धर्म आणि ब्राह्मण हेदेखील वेगळे आहेत. हिंदू सर्वांना जवळ घेणारा तर ब्राह्मण दुसऱ्याना तुच्छ लेखणारा, दूर लोटणारा आहे. गोविंद प्रभूंचा वावर वेगळा होता हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. अापल्याच देशाचं नुकसान जाती व्यवस्थेमुळे नाही तर धर्मामुळे झाले आहे’, असे परखड मतही नेमाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...