आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरमशागतीसाठी स्वयंचलित यंत्रांना पसंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - येथील कृषक भारत समाजातर्फे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यात शेतीसाठी उपयुक्त अशा वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात कीटकनाशक, ठिबक सिंचनाच्या कंपन्यांचे साहित्य, कृषी पुस्तके, टिश्यू कल्चर, बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप, नेटशेडचे सेट, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर यासारखी विविध यंत्रांचा समावेश आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद
मिळत आहे.
मंजुरांच्या टंचाईने हैराण, चाराटंचाईमुळे न परवडणारी बैलजोडी, वेळेचा अपव्यय यामुळे शेतक-यांकडून आंतरमशागतीसाठी तसेच शेतीच्या इतर कामांसाठी स्वयंचलित यांत्रिक साधनांना पसंती आहे. नांगरटी, वखरटी पाठोपाठ आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी, कोळपणी यासह सर्वच आंतरमशागत करण्यासाठी साधने उपलब्ध झाली आहे. शासकीय अनुदान असल्याने आणि नेहमीच्या मजुरीपेक्षा ही
साधने परवडणारी असल्याने शेतक-यांची यांत्रिक शेतीसाधनांना पसंती आहे. ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर, व्ही-पास, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, स्वयंचलित स्प्रेपंप आदी साधनांना शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘स्वतंत्र कृषी बजेट’वर व्याख्यान
केंद्रात आणि राज्यातील सरकार शेतक-यांच्या विरोधात असल्याने कुणी कितीही उपोषणे केली तरी काही होणार नाही. शेती वाचवायची असेल तर व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टीकोनातून पहावे लागेल, त्याशिवाय शेतीला भवितव्य नाही. देशात कृषीचे धोरणच नाही, तोंडी लावण्यासाठी राजकारणी लोक बळीराजा, पोशिंदा ही विशेषणे लावून राजकारण करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी केले. कृषी प्रदर्शनात स्वतंत्र कृषी बजेट का नाही? या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर, वसंतराव महाजन, शेतकरी संघटनेचे चिमण पाटील आदी उपस्थित होते.
घरीच उघडा प्रयोगशाळा
शेतीसाठी आवश्यक असलेले किमान शास्त्रीय ज्ञान शेतक-यांपर्यत पोचविण्यासाठी भगीरथ इंग्लिश स्कूलच्या सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात स्टॉल लावला आहे. भेट देणा-या शेतक-यांना घरीच प्रयोगशाळा उघडून शेतीचे आरोग्य सुधारण्याच्या टिप्स ही मुले देत आहेत. रोपे लावण्यासाठी आवश्यक माती, तीची पोत कशी तपासावी, मातीतील सुक्ष्मजीव कसे शोधावे, मातीचे बाष्पीभवन आणि सेद्रिंय कीटकनाशके कशी बनवावी, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देत विद्यार्थी शेतक-यांच्या समस्यांचे निरसण सुद्धा करत आहेत. भगिरथ विद्यालयातील पीयूष दोषी, वैभव निकम, ज्ञानेश्वर महाजन (इयत्ता 8 वी), मनीष सोनवणे, शुभम मिस्त्री, कमलेश ठाकूर, दिव्यलक्ष्मी पाटील, अंकिता राणे (इयत्ता 7 वी) या विद्यार्थ्यांनी शिक्षक किशोर राजे यांच्या सोबत सुलभ प्रयोगशाळेचे मॉडेल शेतक-यांसाठी प्रदर्शनात ठेवले आहे.