आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide News In Marathi, Financial Crises, Unseasonal Rain

जळगाव जिल्ह्यात आर्थिक संकटात सापडलेल्या तीन शेतकर्‍यांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंदा कुमावत - Divya Marathi
आनंदा कुमावत

अमळनेर/उंबरखेडे/धरणगाव - अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी मंगळवारी आत्महत्या केली. यात दोघांनी गळफास, तर एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन केले.


जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच मंगळवारी जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात देवळी (ता.चाळीसगाव) येथील हरी तुकाराम पाटील (वय 35), डांगरी (ता. अमळनेर) येथील आनंदा एका कुमावत (वय 55) या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच धरणगाव तालुक्यातील साकरे येथील सुरेश रामभाऊ पाटील (वय 60) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.


देवळीच्या शेतकर्‍याची आत्महत्या
उंबरखेडे देवळी येथील हरी पाटील या शेतकर्‍याने मंगळवारी पहाटे स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रब्बी हंगाम हातचा गेला होता. त्यातच वीज कंपनीने शेतीपंपाचे कनेक्शन कट केल्याने शेतकरी विवंचनेत होता. बँकेचे 50 हजार, सोसायटीचे 60 हजार कर्ज या शेतकर्‍यावर होते. कर्जाचा बोजा डोईजड झाल्याने कृषिपंपाचे बिलही त्यांना वेळेवर परत करता आले नाही. मृत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.


डांगरीच्या शेतकर्‍याची आत्महत्या
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन शेतकर्‍याने आत्महत्या केली. आनंदा एका कुमावत (बेलदार, वय 55) यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 70 ते 80 हजार रुपयांचे कर्ज होते. तसेच या हंगामात त्यांनी मका व कापसाची लागवड केली होती; मात्र गारपिटीने या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने कुमावत यांना कर्जफेडीची चिंता सतावत होती. मंगळवारी एकटे असताना त्यांनी घराच्या छतास दोर बांधून गळफास घेतला. ही घटना त्यांच्या नातीने पाहिली व आजीला कळवली. आनंदा कुमावत यांच्या पश्चात प}ी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.


साकरे येथील शेतकर्‍याची आत्महत्या
धरणगाव तालुक्यातील साकरे येथील रहिवासी सुरेश रामभाऊ पाटील (वय 60) या शेतकर्‍याने मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली. सुरेश पाटील या शेतकर्‍याकडे 5 एकर शेती असून त्यांच्यावर सोसायटीचे 86 हजार रुपयांचे कर्ज होते.


आतापर्यंत नऊ घटना
गारपिटीच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यात आणखी तीन शेतकरी वाढले आहेत.