आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सर्वच शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा; पिकांची नाजूक अवस्था, पाणीटंचाईचे सावट गडद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - कोरडवाहू जमिनीचे अधिक प्रमाण असलेल्या पारोळा तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात दणका दिल्याने शेतकर्‍यांवर संकट ओढवले. निम्मा पावसाळा संपल्यात जमा असतानाही पावसाने डोळे फिरवल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली असून पाणीटंचाईची भीती वाढली आहे.

पारोळा तालुक्यात सन 2013 मध्ये 19 आॅक्टोबरअखेर पावसाची सरासरी 107.6 मिलिमीटर एवढी झाली होती. त्यामुळे धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु या वर्षी पावसाला उशिराने सुरुवात होऊनही 17 आॅगस्ट 2014अखेर पारोळा तालुक्यात सरासरी 8.2 मिलिमीटर म्हणजेच 263 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरील पिके उन्ह धरू लागली आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास या पिकांचे अस्तित्व धोक्यात येईल. तसेच पावसाअभावी विहिरींच्या पाण्याची पातळीही कमी झाल्याने बागायती पिकांनाही फटका बसणार आहे.

...या पिकांना जाणवतेय झळ
तालुक्यात कापसासह उडीद, सोयाबीन, मूग, बाजरी, ज्वारी, मका, करडई आदी पिकांची पेरणी झाली आहे. तर बागायती कापसाची स्थिती सध्या बरी आहे. मात्र, पाऊस न झाल्यास त्यांच्यावर परिणाम होईल. उर्वरित बाजरी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांवर आताच उन्हाचा परिणाम जाणवात आहे.

ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यातील बहुतांश धरणे, विहिरी यांची पाण्याची पातळी खालावल्याने काही भागात विहिरी अधिग्रहीत कराव्या लागत आहेत. या नुसार पळासखेडे सिम येथे दोन व भोंडण दिगर येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरू झाले आहे. आगामी काळात गुरांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल.

उपाययोजनांना गती हवी
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धरणांचे पाणी आरक्षित करणे, पाणीचोरी थांबवणे, थंड बस्त्यात पडलेल्या योजनांना गती देणे, अशा मोहिमांना प्राधान्य देण्याची गरज आहे.

कमी पावसाचा फटका
कमी पावसामुळे सर्वाधिक फटका बी-बियाणे, फर्टिलायझर व्यावसायिकांना बसला आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करणारा हा वर्ग कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

आर्द्रता वाढली
पावसाळा सुरू असताना सकाळी वाढती आर्द्रता तर तर दुपारी कडक उष्माघात यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून दमदार पावसाशिवाय उष्माघात व आर्द्रता कमी होणार नाही. त्यामुळे बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.