जळगाव / धुळे- सरसकट कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकरी सोमवारी रस्त्यावर उतरला. खान्देशातील शेतकऱ्यांनीही रास्ता रोको आंदोलन करीत चक्का जाम केला. शेतकरी संपा इतकीच धार या आंदोलनाला दिसून आल्याने नागपूर-सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला.
राज्यसरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला खरा; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे १० हजार रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी राज्यभर रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास प्रतिसादही मिळाला. जळगाव शहराजवळील नागपूर-धुळे महामार्गावरीलबांभोरी गावाजवळ गिरणा नदी पुलावर रास्ता रोको केला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास तब्बल पाऊणतास आंदोलन झाले. त्यामुळे महामार्गावर तीन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. तासाभरानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. चाळीसगाव, भडगाव, पाचाेऱ्यात सुकाणू समितीतर्फे रास्ता राेकाे केला. अांदाेलकांच्या शिष्टमंडळाने तालुकानिहाय तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. पाचाेऱ्यात अांदाेलनामुळे दाेन तास वाहनांच्या रांगा लागल्या. चाेपडा तालुक्यात धानाेऱ्यात अखिल भारतीय किसान सभेने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमहामार्ग राेखला. वृद्ध शेतकऱ्यांचा अांदाेलनातील सहभागी लक्षवेधी ठरला. अांदाेलनस्थळी पाेलिसांनी बंदाेबस्त तैनात केला हाेता.
राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करून चक्का जाम करण्यात आला. नगरच्या अकोले येथील आंदोलनात १० हजार विद्यार्थी सहभागी झाले. नाशिक जिल्ह्यातही पुणे महामर्गावरील पळसे, त्र्यंबकेश्वर महामार्गावर निदर्शने केली.
विसरवाडी सुरत-नागपूर महामार्गावरील विसरवाडी येथे सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महामार्ग ठप्प झाला. कर्जमाफीबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दहिवेल साक्रीतालुक्यातील दहिवेल येथेही शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. येथेही तासभर आंदोलन झाल्याने महामार्गावरील वाहतूक थांबली होती. सुरतहून धुळ्याकडे आणि धुळ्याहून सुरतकडे जाणारे प्रवासी अडकून पडले होते.