आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनागोंदी कारभार पेरणी आटोपल्यावर मिळाली यंत्रसामग्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - येथील कृषी विभागात नुकतीच पेरणीची अद्ययावत यंत्रसामग्री दाखल झाली आहे. शेतक-यांना अनुदान तत्त्वावर हे कृषी साहित्य उपलब्ध होणार आहे. मात्र, तालुक्यातील पेरण्या आटोपून जवळपास महिनाभराचा कालावधी उलटल्यावर ही यंत्रे उपलब्ध झाल्याने शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बीबीएफ पेरणी यंत्र आणि ट्रॅक्टरद्वारे पेरणीसाठी अद्ययावत यंत्रे कृषी विभागाला प्राप्त झाली आहेत. या दोन्ही यंत्रांच्या मदतीने पेरणीचे काम आणखीनच सोपे झाले आहे. बीबीएफ आणि ट्रॅक्टरद्वारे पेरणीचे दोन्ही यंत्र प्रत्येकी 12 संख्येने उपलब्ध झाली आहेत. शेतक-यांसाठी दोन्ही यंत्रे फायदेशीर ठरणार असून यातील बीबीएफ यंत्र हे आकाराने लहान आहे. त्याद्वारे गहू, मका, हरभरा या पिकांची पेरणी करता येते. तसेच या यंत्रांद्वारे कमी अधिक पावसाच्या पाण्याचेही योग्य नियोजन करता येते. गादी वाफे तयार करून जास्त असलेले पाणी वाफ्यातून बाहेर सोडले जाते. तर पिकाच्या गरजेनुसार पाणी वाफ्यात साठवले जाते. अल्प-भूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतक-यांसाठी बीबीएफ यंत्राची किंमत चार हजार 348 रुपये आहे.
ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे वाफे तयार करून पेरणीचे काम करता येते. पेरणीसह खतांचा पुरवठा करणे, पेरलेल्या बियाण्यांवर मातीचा चर देणे अशी कामेही या यंत्राद्वारे करता येतात. गहू, हरभरा, ज्वारी, कपाशी, मका इत्यादी पिकांची पेरणी या यंत्राद्वारे केली जाऊ शकते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. शेतक-यांसाठी या यंत्राची किंमत 39 हजार 600 रुपये ठेवण्यात आली आहे. पेरणीच्या यंत्रांमध्ये फायबरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गंज लागल्याने यंत्र खराब होण्याची चिंता मिटली आहे.

असा मिळेल लाभ
यंत्रांचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी कृषी विभागाकडून अर्ज घ्यावा, अर्जासह खाते उतारा, 7/12 उतारा, ट्रॅक्टरचे आरसी बुक अशी कागदपत्रे जोडावीत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतक-यांना त्वरित अनुदान तत्त्वावर यंत्रे उपलब्ध होणार आहेत.

त्रास वाचणार
पेरणी यंत्रातून एकाचवेळी बियाणे आणि खत देता येईल. वाफे तयार करणे, पेरलेल्या बियाण्यांवर मातीचा चर देणे अशी कामेही सहज होणार आहेत. त्यामुळे शेतक-यांचा वेळ आणि त्रास वाचेल. नंदकुमार चौधरी, सहायक कृषी पर्यवेक्षक, रावेर

या कामांना गती
अद्ययावत पेरणी यंत्राद्वारे पेरणीसोबत खतेही देता येतील. गहू, हरभरा, मका अशा पिकांची पाहिजे त्या अंतराने पेरणी करता येईल. पेरणीनंतर पिकावर मातीचा चर देता येईल. एकाच दिवसात 10 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येईल. कमी अधिक पावसाने नुकसान होणार नाही.

योग्य नियोजन
- पेरणी यंत्राद्वारे कमी अधिक पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करता येईल. कमी पावसाच्या स्थितीत वाफ्यात पाणी साचेल, तर अधिक पाऊस झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करता येईल. अत्याधुनिक यंत्रात ही सुविधा उपलब्ध आहे. ए.टी.झांबरे, मंडळाधिकारी, कृषी विभाग, रावेर