आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बाप वाचले, मुलाचा जीव गेला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात पाट्याचे घाव घालून स्वत:ही गळफास घेण्याचा प्रयत्न केला... मात्र, सुदैवाने दोघेही बचावले. पत्नीवर हल्ला करताना सातवर्षीय मुलाच्या छातीवर पाटा पडल्याने त्याचा मात्र जीव गेला. जळगावातील तळेले कॉलनीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली. पती-पत्नीच्या वादाची भयंकर शिक्षा पहिलीत शिकणार्‍या निष्पाप बालकाला मात्र भोगावी लागली.

वेगळे राहण्यासाठी वाद
‘सुमारे 10 वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले. मात्र, मीनाक्षी काही दिवसांपासून वेगळे राहण्यासाठी हट्ट धरून बसली होती. यातून वाद होत असल्याने तिला संपवायचे अन् आपणही गळफास घ्यायचा, असे ठरवले होते. मुलाला मारण्याचा इरादा नव्हता. पण तो कसा मारला गेला हे कळत नाही,’ असे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी प्रमोद गिरधारीलाल चव्हाण (33) याने पोलिसांना सांगितले. त्याची प्रकृती सुधारत असून पत्नी मीनाक्षी मृत्यूशी झुंज देत आहे. या दांपत्याची चार वर्षांची मुलगी प्राची सुदैवाने सुखरूप आहे.

मृत्यूच्या दाढेतून प्रमोद परतला
प्रमोद आणि त्याचा मोठा भाऊ जगदीश चव्हाण हे दोघेही आईसह एकत्र राहतात. मधला भाऊ भैरवलाल शेजारीच स्वतंत्र राहतो. शहरातील नेरीनाका परिसरात तिघांचीही शेजारी शेजारी स्वतंत्र दुकाने आहेत. मोठा भाऊ चपलांचा, मधला वाहनांच्या नंबरप्लेटचा, तर प्रमोद शहाळे विकण्याचा व्यवसाय करतो. गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजेच्या सुमारास प्रमोदच्या खोलीतून मीनाक्षीच्या किंचाळण्याचा आवाज झाला. त्यामुळे शेजारच्याच खोलीतून जगदीश आणि त्यांचे कुटुंबीय आणि शेजारीही पळत आले. प्रमोदला आणि मीनाक्षीला हाका मारल्या; पण त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडण्यात आले. त्या वेळी घरात अंधार होता. बटण दाबताच मीनाक्षी आणि वीरेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, तर प्रमोद छताच्या कडीला बांधलेल्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता, असे जगदीश यांनी सांगितले. या सर्वांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

पैशासाठी मीनाक्षीचा छळ
मीनाक्षीने माहेरून 50 हजार रुपये आणावेत, अशी मागणी प्रमोद आणि त्याचे भाऊ करीत होते. त्यावरून तिला महिनाभरापूर्वीच मारहाणही झाली होती आणि तिने तसे फोन करून आम्हाला सांगितलेही होते. शिवाय, आमची स्थिती गरिबीची असल्याने आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही, असेही मीनाक्षीला ऐकविण्यात येत होते. याच कारणावरून हा प्रकार झाला, असा आरोप मीनाक्षीचा भाऊ राज बोरवाल याने केला आहे. मीनाक्षीची सासू मात्र तिच्याशी चांगली वागत होती, असेही त्याने सांगितले.

प्रमोदवर खुनाचा गुन्हा
पित्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सातवर्षीय वीरेंद्रच्या अंत्यसंस्कारानंतर मीनाक्षीची माहेरची मंडळी शनिपेठ पोलिस ठाण्यात गेली आणि प्रमोदसह त्याच्या कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. सायंकाळपर्यंत मात्र तसा काही गुन्हा दाखल झाला नव्हता. भैरवलाल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून प्रमोदविरुद्ध खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.