आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाअभावी बियाणे बाजार मंदावला; एक हजार कोटींची उलाढाल थांबली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - पाऊस लांबल्याने खत व बियाणे यांची विक्री पूर्णत: ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी खत व बियाण्यांसाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खतांची विक्री होत नसून वेळेनुसार पीक पद्धतीही बदलणार आहे. त्यामुळे खते व बियाण्यांचे करायचे काय? असा यक्ष प्रश्न आज बियाणे विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे. काही शेतकर्‍यांनी धूळ पेरणी व बागायती कपाशीची लागवड केली असून तब्बल 25 कोटी रुपयांचे बियाणे आजघडीला मातीत टाकलेले आहे. पाऊस लांबल्याने अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
दरवर्षी सरासरी जून महिन्याच्या अखेरपर्यंत 50 टक्के पेरण्या पूर्ण होतात. पेरणीसाठी लागणार्‍या बियाण्यांची बुकिंग व्यापारी दिवाळीदरम्यान कंपनीकडे करतात. तेव्हापासून व्यापार्‍यांचा पैसा कंपन्यांकडे जमा होतो. साधारण मे महिन्याच्या मध्यापासून बागायती कापसाची तर जून महिन्याच्या मध्यापासून अन्य पिकांची पेरणी होते. यासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकरी सर्व बियाण्यांची खरेदी करतो आणि दिवाळीपासून अडकलेला व्यापार्‍यांचा पैसा मोकळा होतो. मात्र, यावर्षी अद्यापही पावसाची चिन्ह दिसत नसल्याने जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतही पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आजतरी दिसत नाही. व्यापारी बियाणे विक्रीसाठी घेऊन बसला तरी शेतकरी घेण्यास तयार नाही. त्यामुळे बाजारपेठेतील बियाण्यांची विक्री पूर्णत: ठप्प आहे. पेरणीच झाली नसल्याने खतांच्या विक्रीचा प्रश्नच येत नाही. गोदामांमध्ये खतांच्या थप्प्याही तशाच पडून आहेत. अशाप्रकारे खते व बियाण्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी केलेली तब्बल एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आज व्यापार्‍यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. पाऊस नसल्याने पेरणीला सुरुवातच झाली नसून लागवड केलेल्या थोड्याफार शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरण्या लांबल्याने उत्पन्नात घट अटळ असून याचा शेतकर्‍यांना तोटा होणारा आहे; तसेच व्यापार्‍यांची रक्कमदेखील जास्त कालावधीसाठी अडकून पडल्याने नफ्याचे प्रमाण घटणार आहे. एकंदरीतच खते व बियाण्यांच्या माध्यमातून केलेल्या एक हजारावर कोटींच्या गुंतवणुकीमुळे व्यवहार ठप्प झाले असून बाजारातही मंदीचे सावट आहे.

25 कोटींचे बियाणे मातीत
काही शेतकर्‍यांनी बागायती कापसाची लागवड केली आहे; मात्र अद्यापही पावसाची चिन्ह दिसत नसल्याने झालेल्या लागवडीला आवश्यक असे वातावरण मिळत नसल्याने उत्पन्न घटणार आहे. एकदाचा पाऊस सुरू झाला की मजूर मिळत नाहीत, त्यामुळे अनेक शेतकरी धूळ पेरणी करतात. बागायती कपाशीची लागवड व धूळ पेरणीच्या माध्यमातून आजपर्यंत 25 ते 30 कोटी रुपयांचे बियाणे शेतकर्‍यांनी मातीत टाकून ठेवले आहे.
दोन पैसे मिळतील या आशेवर बियाणे व खते विक्रेत्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. पावसाअभावी बियाण्यांची वेळेत विक्री होऊ शकलेली नाही. पेरणीच झाली नसल्याने खतांच्या उठावाचा प्रश्नच येत नाही. ठप्प झालेला बाजार पाहता खते व बियाण्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गुंतून पडले आहेत. आता या मालाचे करायचे काय? हा प्रश्न असून नफा सोडाच मुद्दल व व्याज निघेल की नाही? याबाबतच शंका व्यक्त होत आहे.
विनोद तराळ, जिल्हाध्यक्ष बियाणे विक्रेता संघटना

बळीराजा बचावला
एरवी जून महिन्यात पडलेल्या एखाद दुसर्‍या पावसावरच पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 30 ते 40 टक्के असते; मात्र यावर्षी एकही पाऊस न पडल्याने ज्यांच्याजवळ पाण्याचे साधन आहे अशाच शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. जर एखादा पाऊस पडला असता तर अनेक शेतकर्‍यांनी पेरणी केली असती; नंतर पावसाअभावी लागणारी मजुरी, बियाणे, खत यांच्यावरील झालेला खर्च वाया गेला असता. त्यामुळे एकप्रकारे शेतकरी आर्थिक खर्चापासून वाचलाच आहे.