आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Few Days Before Flood And Now Inflation In Jalgaon City

आता महागाईची अतिवृष्टी भाज्या कडाडल्या, फुले कोमेजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आठवडाभरापूर्वीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पडसाद अद्यापही कमी झालेले नाहीत. पावसाने भाजीपाल्याची नासाडी केल्याने भाज्यांचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. यातच पितृपक्ष सुरू झाल्याने भाज्यांना मागणीही वाढली आहे. परिणामी १५ दिवसांपूर्वी उतरलेले भाज्यांचे भाव पुन्हा वाढले असून ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे.

गणेशोत्सवात झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग आठ दिवस पाऊस सुरूच राहिल्याने भाजीपाल्याचे पीक संपूर्ण वाया गेले. जो माल हाती आला होता, तो ही बाजारापर्यंत न पोहोचल्याने मोठी नासाडी होऊन बाजारात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गणपती स्थापनेपर्यंत स्थिरावलेले भाज्यांचे दर गणपती विसर्जनानंतर चांगलेच कडाडले आहेत.

पितृपक्षामुळे वाढली मागणी
गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षामुळे विविध भाज्यांना मागणीही वाढली आहे. यातच अतिपावसाने खराब झालेला भाजीपाला व वाढलेली मागणी यामुळे ही दरवाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. जिल्हाभरातून भाजीपाला शहरात येतो, शेतातून आलेला भाजीपाला बाजारापर्यंत पोहोचवताना पावसामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहेत, परिणामी ही तूट भाववाढीतून भरून काढली जात आहे.

बाजार समितीतही जिल्हाभरातून आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला असून उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही खरेदीचा भाव वाढवून द्यावा लागत आहे. या परिस्थितीचा परिणाम आणखी काही दिवसांपर्यंत कायम राहील, असे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

फुलांना मागणी कमी
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कुंदकळीच्या फुलांचेही मोठे नुकसान झाले आहे. या मोसमात त्यांचे अधिक उत्पादन घेतले जाते. तसेच निशीगंध, लिली, केरडा, झेंडू आदी फुलांवरही काही प्रमाणात पावसाचा परिणाम झाला आहे. पितृपक्षामुळे पूजा-अर्चा होत नसल्याने फुलांची मागणीही कमी झाली आहे. परिणामी दरात वाढही झालेली नाही. दुर्गोत्सव व दसऱ्याला हे भाव पुन्हा वाढतील. खेमचंद्र महाजन, फूल विक्री व्यावसायिक.

भाजीपाला खराब झाल्याने वाढले भाव
१५ दिवसांपासून पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. थोडाही खराब भाजीपाला ग्राहक घेत नाहीत, तो फेकावाच लागतो. परिणामी दरवाढ केल्याशिवाय पर्यायच उरत नाही. पितृपक्षामुळे मागणी वाढली आहे, पाऊस थांबून पूर्ववत स्थिती झाल्यावरच हे भाव पुन्हा कमी होतील.नीलेश माळी, भाजीपाला विक्रेता

असे आहेत भाज्यांचे दर
भेंडी
४० रुपये किलो
टोमॅटो
४० रुपये
वांगी
३५ रुपये
गंगाफळ
२० रुपये
मेथी
५० रुपये
पालक व पोकळा
४० रुपये
गिलके
३५ रुपये
गवार
५० रुपये
चवळीच्या शेंगा
५० रुपये
पत्ताकोबी
३० रुपये
हिरवी मिरची
३० रुपये
काकडी
२० रुपये
कोथिंबीर
४० रुपये
भोपळा
३० रुपये