आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटातील वाद वाहनांची तोडफोड; गुन्हेगारी संवेदनशील जुने धुळे परिसरात पुन्हा उफाळला संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील जुने धुळे परिसरातील गायकवाड चौकात काल मंगळवारी रात्री घर खाली करण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या वेळी घरावर दगडफेकही करण्यात आली. तसेच वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगरात राहणारे प्रकाश त्र्यंबक बडगुजर यांनी गायकवाड चौकातील रूपेश अशोक मोरे यांना तीन वर्षांपूर्वी खोली राहण्यासाठी दिली होती. ही खोली रिकामी करून द्यावी, असे प्रशांत बडगुजर यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने रूपेश मोरेसह इतर पंधरा जणांनी बडगुजर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्याचबराेबर घरातील वस्तूंची नासधूस केली.
या वेळी बडगुजर यांच्या घरात ठेवलेली १९ हजार रुपये किमतीची पाच तोळे सोन्याची चेन एक लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेण्यात अाल्या. तसेच बाहेर ठेवलेल्या एचपी १३ एचपीचे विद्युत पंप चोरून नेले आहे. या वेळी प्रशांत बडगुजर यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याने ते जखमी झाले अाहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रकाश बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रूपेश अशोक मोरे, दत्तू काशीनाथ साळवे, मधुकर काशीनाथ साळवे, कुंदन मधुकर खरात, कुणाल विठ्ठल साळवे, दीपक रघुनाथ साळवे, दत्तू रघुनाथ साळवे, आकाश साळवे, अण्णा दत्तू साळवे, सिद्धार्थ दिलीप साळवे, सूरज उर्फ बुटक्या दिलीप साळवे, कुसुम अशोक साळवे, नूतन भूपेश मोरे, रंजना काशीनाथ साळवे, लखन रघुनाथ साळवे यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याच प्रकरणात नूतन भूपेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिनू प्रकाश बडगुजर यांच्या मालकीचे घर खाली करण्याच्या वादातून टिनूने रंजन मोरे यांच्या दहा वर्षाच्या मुलीला धरून ओढाताण केली. टिनू प्रकाश बडगुजर, मारत्या प्रकाश बडगुजर, बहूर राज्या, भोल्या, आशू, भुऱ्याचोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात दगड, विटा अन‌् काचांचा खच
या घटनेनंतर बडगुजर यांच्या घरात दगड, विटा तसेच बाटल्या फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काचा पडल्या होत्या. तसेच घराच्या बाहेर ठेवलेल्या लाकडी वस्तूंचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. तसेच घराच्या बाहेर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने काचा सकाळी तशाच पडल्या होत्या.
चोख बंदोबस्त
गायकवाड चौकात दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. तसेच शांततेसाठी दोन्हीकडील समूहांना आवाहन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक लहांगे आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान बुधवारी दिवसभर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुने धुळे परिसरात विशिष्ट भागात वारंवार वाद उद‌्भवत असल्यामुळे कायमस्वरूपी बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे या वेळी पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले.