आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक होता वाल्ह्या’चे शहरात चित्रीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘एक होत्या वाल्ह्या’ या आदिवासी कोळी जमातीवरील वास्तववादी मराठी चित्रपटासाठी शहरात दिवसभर चित्रीकरण करण्यात आले. शहरातील कलावंतांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील मोर्चाच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरणावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.

सामाजिक प्रश्न हाताळला
चित्रपटाचे निर्माता मुकेश ठोमरे, कार्यकारी निर्माता विजय कोळी, लेखक व दिग्दर्शक शरदचंद्र जाधव हे आहेत. प्रियंका, ससाणे, मनोहर भगत, सुनील सोनार, अरविंद चव्हाण, विजय कोळी, डॉ.शांताराम सोनवणे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. मुंबई येथील शार्प माइंड मुव्हिंग इमेजेस या चित्रपट संस्थेकडून या आदिवासी कोळी जमातीवरील सामाजिक प्रश्नांवरील हा चित्रपट बनवला जात आहे. समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चित्रपटातील कथानकानुसार मंत्रालयावर मोर्चा नेण्याचे दृश्य या वेळी साकारण्यात आले. मोर्चासाठी समाजबांधवांना एकत्र जमण्याचेही आवाहन केले होते. मात्र, मोर्चासाठी लागणारी पुरेशी गर्दी न झाल्याने आयोजकांना यासाठी बराच वेळ प्रतीक्षाही करावी लागली. रोटरी भवनातून काव्यरत्नावली चौकातून गणपतीनगरमार्गे रोटरी भवनात हा मोर्चा नेण्यात आला. या वेळी मोर्चकर्‍यांवर झालेला गोळीबार, यात गोळी लागून जखमी झालेल्या वाल्ह्या कोळी याला गोदावरी हॉस्पिटलात नेण्यापर्यंतचे चित्रीकरण सायंकाळपर्यंत झाले.

सप्टेंबरमध्ये होणार चित्रीकरण पूर्ण
चित्रीकरणासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. चित्रपटाचे 75 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून दोन महिन्यात चित्रीकरण पूर्ण होऊन तो सप्टेंबर महिन्यात विविध चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे निर्माता मुकेश ठोमरे यांनी सांगितले. कथानकात भारताच्या स्वातंत्र्यानंतरची मानसिकता व आदिवासी जमातींच्या सामाजिक प्रश्नांवर लक्षवेधक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजची आदिवासी कोळी आणि तत्सम जमातींची वास्तविक परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे निमंत्रक म्हणून डॉ. शांताराम सोनवणे, कोळी संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ, मुकेश सोनवणे, रामभाऊ सोनवणे काम पाहत आहेत.