आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटगृहांमध्ये अद्याप सीसीटीव्ही बसवले नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चित्रपटगृहांसह परिसरात होणार्‍या गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षक कुबेर चवरे यांनी चित्रपटगृहचालकांना दिल्या. मात्र, अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी रात्री राजकमल चित्रपटगृहात झालेल्या हाणामारीनंतर सीसीटीव्हीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.

शहरातील अशोक, राजकमल चित्रपटगृह अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहेत. या परिसरात छोट्या-मोठय़ा प्रकारचे गैरप्रकार होतच असतात. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्येही किरकोळ कारणांवरून भांडणे होतात. अशी परिस्थिती लक्षात घेता शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांनी शहर पोलिस ठाण्यात चित्रपटगृहचालकांची बैठक घेऊन थिएटर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी सूचना केल्या होत्या. या बैठकीत चित्रपटगृहांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते. याच बरोबर महिलांचे दागिने सुरक्षित रहावे या साठी सावध राहण्याच्या काही सूचनांची ध्वनिफीतही वाजवण्याची सूचना करण्यात आली होती.

पोलिस बंदोबस्त महाग
चित्रपटगृहचालकांना पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त ठेवणे महाग ठरू शकते. कारण एका पोलिस कर्मचार्‍याच्या 24 तासांच्या बंदोबस्तासाठी 1510 रुपये एवढा खर्च आहे. त्यामुळे त्यांना खासगी सुरक्षा रक्षकच ठेवणे सोपे जाईल.

गुन्हा दाखल
शुक्रवारी झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात शहर ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला. विकारखान शफिउल्लाह खान याच्या फिर्यादीनुसार समीरखान अय्युब खान, इब्राहीमखान सादीक खान आणि नईमखान निजाम खान यांना आरोपी केले. तर समीरखानच्या फिर्यादीनुसार विकारखान, अज्या, मायकल यांना आरोपी केले. शुक्रवारी रात्रीच समीरखान, नईमखान, जुबेरखान आणि राजीक खान यांना अटक केली. शनिवारी न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी दिली.

मेट्रो थिएटरला सीसीटीव्ही
शहरात मेट्रो थिएटरच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या शिवाय नटवर मल्टिप्लेक्समध्ये काम सुरू आहे तर अशोक आणि राजकमल येथे अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही. शुक्रवारी झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर आता तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महेंद्र लुंकड, संचालक