आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन बंब धूळ खातोय, नागरिक संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव - आग प्रतिबंधासाठी लाखो रुपये खचरून आणलेला बंब अद्यापही लोकांच्या सेवेसाठी दाखल झाला नाही. प्रशासकीय अडचणीचे कारण पालिका प्रशासन दाखवित आहे. लवकरात लवकर बंब वापरात आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वी शासकीय निधीतून बंब खरेदी करण्यात आला होता. पालिकेला तीन वर्षांपासून मागील महिन्यात पहिल्यांदाच पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले. त्यामुळे प्रलंबित कामांना चालना मिळण्याची आशा असताना पडून असलेला नवा करकरीत बंब सुरू होऊ शकला नाही. दिवाळीदरम्यान पेठ भागात चार्‍याला आग लागली होती. नगरदेवळा येथील जिनिंगमध्येही आगीची घटना घडली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी खूप कसरत करावी लागली. नागरिकांनी बादलीद्वारे तर कुठे मोटारीद्वारे आग आटोक्यात आणली. पालिकेने बंब खरेदी केला असतानाही ही परिस्थिती निर्माण झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. अनुभवी चालक व कर्मचारी नसल्याने आग विझवण्यासाठी बंब पाठवू शकत नसल्याचे उत्तर मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

80 लाखांची योजना
अग्निशामक दल अधिक बळकट करण्यासाठी शासनाने 80 लाखांची योजना मंजूर केली होती. त्यात 20 टक्के रक्कम पालिकेची तर 80 टक्के रक्कम शासनाची होती. 2009 मध्ये योजना मंजूर करण्यात आली होती. अग्निशामक बंबाच्या खरेदीसह पाचोरा रस्त्यावर अग्निशामक दलाच्या कार्यालयाचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थान, कुंपण आदी कामे करण्यात येत आहेत. कामाला गती मिळत नसली तरी किमान बंब तरी सुरू करावा, अशी मागणी आहे.

अशी होती अडचण
योजना मंजूर झाल्यानंतर कर्मचारी नेमणुकीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. योजनेचे काम अध्र्यावर आले आहे. पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याचे ग्रहण सुटले आहे. मागील महिन्यात मुख्याधिकारीपदी बी.जी.तडवी यांची नियुक्ती करण्यात आली.