आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबापुरात घराला आग; 50 हजारांचे झाले नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तांबापुरा भागातील मेहरूणरोड गोडाऊनसमोरील इस्माइल तेली यांच्या घराला रविवारी दुपारी 3.35 वाजता आग लागली. यात सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे तेली यांचा मुलगा सादीक तेली याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

रविवारी सकाळी तांबापुरातील संचारबंदी हटविल्यानंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत होण्याच्या मार्गावर असतानाच हा प्रकार घडला. दरम्यान, तेली यांची तीन मुले, सुना असे मोठे कुटुंब या घरात राहते. दंगलीमुळे परिसरात लागलेल्या संचारबंदीमुळे सर्वजण तांबापुरा सोडून नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेले होते. नळाला पाणी येणार असल्यामुळे पाणी भरण्यासाठी सादीक हे घरी आले होते. पाणी भरून झाल्यावर त्यांनी घराला कुलूप लावले. अंगणात काही वेळ घालवल्यानंतर घरातून धूर येत असल्याचे त्यांना दिसले. कुलूप उघडून पाहिल्यानंतर त्यांना घरातील वायरींग पेटत असल्याचे दिसून आले. क्षणातच घरातील गादी, टीव्ही, फ्रिज तसेच इतर गृहोपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. परिसरातील नागरिक आणि अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी प्रय} करून आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी अनेक वस्तू खाक झाल्या होत्या. या आगीत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनर्थ टळला
सादिक यांच्या भावाचा गादी भंडारचा व्यवसाय आहे. त्यामुळे घरातील वरच्या मजल्यावर मोठय़ा प्रमाणात कापूस व गाद्या होत्या. तसेच किचनमध्ये तीन गॅसचे भरलेले सिलिंडर होते. कापूस आणि गाद्यांपर्यंत आग पोहोचली नाही; अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.