आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे वर्षभरात जिल्हाभरात विविध कारवाईत 17 लाखांचा गुटखा जप्त केला होता. तो माल गुरुवारी पालिकेच्या ममुराबाद शिवारातील बंद पडलेल्या रिसॉर्स फॅक्टरी परिसरात नष्ट करण्यात आला. संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
राज्य शासनाने बंदी आणल्यानंतरही छुप्यारितीने गुटखा विक्री सुरू आहे. महापालिका हद्दीत गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईत 90 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. गुटखा ठेवण्यास पालिकेकडे जागा नसल्याने अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या दालनातच तो सील करून पडून होता.
अन्न सुरक्षा विभागातर्फे वर्षभरात जिल्ह्यातील नशिराबाद, अजिंठा चौफुली, पारोळा या ठिकाणी केलेल्या कारवाईत 16 लाखांचा गुटखा जप्त केला होता. जप्त केलेल्या गुटख्याची विल्हेवाट होत नसल्याने तो साठवून ठेवण्यास जागा अपूर्ण पडू लागल्याची स्थिती होती. अखेर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी.यू. पाटील व पालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहरे यांच्या आदेशान्वये गुरुवारी संयुक्तपणे जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत पालिकेचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. पांडे, ए. के. गुजर, किशोर बाविस्कर, व्ही.आर. बोंडे, चंद्रकांत सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रदीप पवार, रवी निकम, नरेंद्र काळे, आर.व्ही. पाटील, संतोष ठाकूर हे कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईचे केले चित्रीकरण
पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ट्रकमध्ये गुटखा भरून नेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील व नंतर पालिकेचाही गुटखा त्यात भरण्यात आला. ट्रक भरल्याने काही गुटखा कॅबीनमध्ये भरण्यात येऊन घटनास्थळी नेण्यात आला. याठिकाणी पेट्रोल व डिझेल टाकून गुटखा नष्ट करण्यात आला. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चाललेल्या संपूर्ण कारवाईचे प्रशासनातर्फे चित्रीकरण करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.