आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firing On Railway Protection Force At Chalisgaon Railway Station

चाळीसगाव रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानावर गोळीबार, अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: राकेश खलाणे
भुसावळ/चाळीसगाव - चाळीसगाव रेल्वेस्थानकावर सोमवारी पहाटे आरपीएफ जवानावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी आरपीएफ, जीआरपी महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त पथक तयार केले आहे. तसेच विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जखमी जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

सोमवारी पहाटे चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील गुडस शेडजवळून दोन संशयित युवक जात होते. या वेळी आरपीएफ जवान राकेश खलाणे यांनी त्यांना चौकशीसाठी थांबण्याची सूचना केली. मात्र, दोघे संशयित पळून जाऊ लागले. त्यामुळे खलाणे यांनी त्यांचा पाठलाग करून एका संशयिताचे जॅकेट पकडले. मात्र, त्याने खलाणे यांच्यावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. सुदैवाने गोळी खलाणे यांच्या डोळ्याला चाटून केली. त्यामुळे डोळ्याला जखम झाली. ही झटापट सुरू असताना दुसरा आरपीएफ जवान खलाणे यांच्या मदतीसाठी धावला; परंतु दोघे संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले. जखमी खलाणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयुक्तांच्या सूचना...
गोळीबाराच्या घटनेमुळे भुसावळ विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवरील प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक रेल्वेस्थानकावर दिवसा रात्री साध्या वेशातील जास्तीत जास्त जवानांची गस्त लावावी, संशयितांची कसून चौकशी करावी यासह खंडवा, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, भुसावळ बडनेरा येथील अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे, आऊटरवरही गस्त कडक करावी, अशा सूचना आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी दिल्या आहेत.
सहायक आयुक्त तळ ठोकून...
आरपीएफचे सहायक आयुक्त ए.के.स्वामी हे घटना घडल्यानंतर तत्काळ चाळीसगावात दाखल झाले. त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी जीआरपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणाच्या तपासासाठी आरपीएफ, जीआरपी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. घटनास्थळी आरपीएफ आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी जवान खलाणे यांची भेट घेऊन त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

पुंगळी केली जप्त...
चाळीसगाव स्थानकावरील गुड‌्स शेडजवळून जात असलेले दोन्ही हल्लेखोर मुंबई-हावडा (व्हाया नागपूर) मेल या गाडीत लूटमार करण्याच्या तयारीत असावेत, असा संशय आहे. मात्र, आरपीएफ जवान खलाणे यांनी हटकल्याने त्यांचा डाव फसला. खलाणे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर डॉ. जयवंत देवरे यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच घटनास्थळावरून गोळीची रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती मिश्र यांनी दिली.

जळगाव, भुसावळात तपासणी...
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-हावडा मेल या गाडीची सोमवारी पहाटे ३.३० वाजता जळगाव वाजता भुसावळ स्थानकावर तपासणी करण्यात आली. आरपीएफ जीआरपीच्या जवानांनी गाडीतील सर्व डब्यांमध्ये कसून शोध घेतला; परंतु आरोपी सापडले नाहीत, अशी माहिती आरपीएफ निरीक्षक विनोदकुमार लांजेवार यांनी दिली.

प्रवाशांना धमकावले...
हावडा एक्स्प्रेसमध्ये दोघा तरुणांनी प्रवाशांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आरपीएक खलाणे हे जनरल बोगीजवळ येतात दोघा तरुणांनी तेथून पळ काढला; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.


श्वान पथक दाखल
गोळीबारझालेल्या घटनास्थळी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले होते. या श्वान पथकाने माग नांदगाव-मनमाड मार्गापर्यंत दाखवला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी कांगणे यांनी भेट दिली.

चोरटे मराठी भाषिक
दोघेहीसंशयित चोरटे मराठी भाषिक स्थानिक असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. २० ते २१ वर्षीय या तरुणांनी अंगात जॅकेट घातले होते. त्यातील एका तरुणाने कानात बाही घातलेली होती. प्रतिकार केल्यानंतर एकाने ‘पळ आता’ असे म्हटले होते.