आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार पानठेल्यांवर रंगणार आता पानाचे विडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्य शासनाने गुटखाबंदी एका वर्षाने वाढविण्यासोबतच पानटपरीतून सर्रास विक्री होणारा मावा, खर्रा, छिटा सुपारी सुगंधित सुपारी यावर बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार टपरी चालकांवर गंडांतर येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रोजची सुमारे 25 लाख रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. त्यामुळे आता पानठेल्यांवर केवळ पानाचे विडे रंगणार आहेत.

गतवर्षी राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. आता ही बंदी आणखी एका वर्षाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुटखाबंदीवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला होता. यामुळे राज्यशासनाने तंबाखूजन्य पदार्थांवरही बंदी घातली आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ मिसळून तयार मावा, सुपारी छिटा मटेरिअल असे पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांना वेगवेगळ्या भागात वेगळी नावे आहेत. असे सर्व पदार्थ तयार करणे व त्यांची विक्री करणे यावर बंदी घालण्याचे कडक आदेश अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात सुमारे पाच हजार पानटपरीचालक आहेत. अशा पदार्थांवर बंदी घालण्यात आल्यामुळे या पानटपरीचालकांवर गंडांतर आले आहे. या व्यवसायावर पाच हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र अशा व्यवसायांमुळे लाखो कुटुंबीय उद्ध्वस्त होत असल्यामुळे बंदी घालण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पानटपर्‍यांच्या माध्यमातून होणारी 25 लाख रुपयांची उलाढाल ढप्प होणार आहे. टपरीचालकांना अन्य व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे. उदरनिर्वाहासाठी अन्य मार्ग शोधावे लागणार आहेत.


भरारी पथकाद्वारे धडक मोहीम
आदेशानंतर तत्काळ मोहीम राबविली जात आहे. पहिल्याच दिवशी पहूर येथे काही साठा हस्तगत केला. थेट उत्पादकांपर्यंत शोध घेतला जाणार आहे. विक्रेत्यांवर 188 व 328 कलम लावण्यात येणार आहे. यासाठी नाशिक विभागातून पथकाची मागणी केली जाणार आहे. बी.यू.पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन