आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात पाच कडूनिंबाच्या वृक्षांची कत्तल; वृक्षप्रेमींनी ट्रॅक्टर घेतले ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण तलावाला लागून असलेल्या श्रीकृष्ण लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत बुधवारी पाच झाडांची कत्तल करण्यात आली. तोडलेल्या झाडांची लाकडे वाहून नेणारा ट्रॅक्टर वृक्षप्रेमींनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. मात्र, महापालिकेचे कर्मचारी हद्द कुणाची, या वादात पडल्याने दोन तास थांबूनही कारवाई झाली नाही. वनविभागाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पंचनामा केला. गुन्हा कुणी दाखल करायचा हा वाद कायम असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.

श्रीकृष्ण लॉन्सच्या दक्षिणेला लागून असलेल्या खुल्या भूखंडात असलेल्या पाच मोठय़ा झाडांची बुधवारी कत्तल करण्यात आली. ही सर्व झाडे कडूनिंबाची होती. लाकडे भरून जाणारा ट्रॅक्टर दिसल्यानंतर वृक्षप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्याने घटनास्थळी धाव घेतली. बबलू पिपरिया, राजेंद्र नन्नवरे, बाळकृष्ण देवरे, निमजी जळगावाला यांनी महापालिका, पोलिस विभाग व वनविभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. शुक्रवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे बी.एस.पाटील यांनी सांगितले.

मेहरुण तलावालगतच्या श्रीकृष्ण लॉनच्या परिसरात तोडली झाडे

वनविभागाचे वनरक्षक एस.सी. गोलाईत यांनी घटनास्थळावरून एमएच 39, 4820 या क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. वनविभागाच्या नर्सरीमध्ये या ट्रॅक्टरचा पंचनामा करण्यात आला.


ट्रॅक्टर मनोज पाटील यांचे
वृक्षतोड केलेली लाकडे वाहून नेतांना पकडण्यात आलेले ट्रॅक्टर मनोज भास्कर पाटील यांच्या मालकीचे आहे. ट्रॅक्टरची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून ट्रॅक्टर ठेकेदाराला भाड्याने दिल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जमीन मालकांचा शोधही घेतला जात आहे.

>संबंधित जमीन मालकाचा घेतला जातोय शोध
>कार्यकर्त्यांच्या हट्टमुळे आले महापालिकेचे अधिकारी

बराच वेळ हद्दीवरून वाद
घटनास्थळी थांबून असलेल्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांच्यासह चार जण तेथे आले. परंतु हद्द कुणाची यावरून बराच वेळ खल सुरू होता. त्यापूर्वीच तेथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी मजूरांना ताब्यात घेतले.