आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3 बहिणींसह 5 महिलांचा धरणात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल (जळगाव)- शहरापासून जवळच असलेल्या अंजनी धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींसह पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यातील एक महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. बुडणाऱ्या एका महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चौघींचाही बुडून मृत्यू झाला.

अंजनी धरणापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर काठेवाडी-भगतवाडी वस्ती आहे. तेथील भुरीबाई रमेश भरवाड (३५), लक्ष्मीबाई मुमा भरवाड, बनीबाई राजू भरवाड (१५) या तिघी बहिणी, त्यांच्या वहिनी मनुबाई विश्राम भरवाड (३०) व अनुबाई लाखा भरवाड (२२) या कपडे व प्लास्टिकचा मोठा तंबू धुण्यासाठी शनिवारी दुपारी गेल्या होत्या. पाल धूत असताना लक्ष्मीबाईचा तोल गेला. त्या पाण्यात बुडत असल्याचे दिसल्याने भुरीबाई, बनीबाई, मनुबाई व अनुबाई यांनी त्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाचही जणी पाण्यात बुडाल्या. एका लहान मुलाने वस्तीवर जाऊन ही घटना सांगितली. लोक येईपर्यंत पाचही जणींचा मृत्यू झाला होता. मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. एकाच परिवारातील पाच महिलांचा मृत्यू झाल्याने भगतवाडी वस्तीवर शोककळा पसरली आहे.

मनुबाई होती गर्भवती
मनुबाई भरवाड ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. डॉ.दिनेश खेताडे यांनी तिच्या पोटातून आठ महिन्यांचा गर्भ काढला. मात्र, तोही मृत होता. या घटनेत तीन भावांच्या परिवारातील पाच महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला.