आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कारभारणींच्या हाती जळगाव शहराचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहराच्या कारभाराचा गाडा आता ख-या अर्थाने महिलांच्या हाती आला आहे. महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी ज्योती चव्हाण यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षानंतर स्थायी समिती सभापतिपदावरही महिलाच विराजमान झाली आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पदांवर एकाचवेळी पाच महिला विराजमान होण्याची जळगाव शहराची ही पहिलीच वेळ आहे. स्रीभ्रूणहत्या, सततचे महिला अत्याचार, मुलींचे घटते प्रमाण या सर्व नकारात्मक गोष्टी दररोजच आपल्या कानावर पडतात या सर्व पार्श्वभूमीवर जळगावातील ही घटना सुखद धक्का देणारी आहे.
महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रयाग कोळी यांच्यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सुनंदा पाटील या काम पाहात आहेत. त्यापाठोपाठ आता ज्योती चव्हाण यांची सभापतिपदी निवड झाली आहे.
काय आहेत आव्हाने : विशेष म्हणजे महापौर, जिल्हाधिका-यांपासून ते जिल्हा क्रीडा अधिकारी या सर्वच पदांवर काम करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. स्थायी समिती सभापती झालेल्या ज्योती चव्हाण यांच्या हाती महापालिकेची रिकामी तिजोरी पडली आहे. जळगाव शहरातील महापालिकेवर सुमारे ५१३ कोटी रुपयांचे कर्ज आहे.कर्जबाजारी पालिकेचा गाडा हाकताना या गृहिणीची कसोटी लागणार आहे. प्रयाग कोळी यांच्याकडे महिला राखीव आरक्षणाचे पाठबळ असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपोआप चालून आले त्यामुळे त्या नशीबवान ठरल्या. महापौर राखी सोनवणे यांचा पालिकेच्या सभागृहातील वावर आत्मविश्वासपूर्ण असतो. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सुमारे वर्षभराच्या येथील कारकिर्दीत काही चांगले निर्णय घेऊन ठसा उमटवला आहे.जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. तर मरगळ आलेल्या क्रीडा क्षेत्राला संजीवनी देण्याचे काम जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांना करावे लागणार आहे.
कायापालट घडवण्याची जबाबदारी
विकासकामे ठप्प असलेल्या जळगाव शहराचा कायापालट घडवण्याची जबाबदारी या महिला अधिकारी व पदाधिका-यांवर येऊन पडली आहे. विकास कामात अधिकारी महिला हिरिरीने पुढाकार घेतात असे दिसून येते; मात्र राजकीय क्षेत्रात महिला पदाधिका-यांचा कारभार त्यांचे पती महोदय पाहात असल्याचा प्रत्यय ठिकठिकाणी दिसून येतो या परंपरेला फाटा देण्याची संधी महापौर, स्थायी समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे.