आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flamingo Bird Found On Tapti River Near Bhusawal

हरताळ्यात ‘फ्लेमिंगों’ची वसाहत; पक्षी अभ्यासकांना प्रथमच झाले दुर्मीळ दर्शन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा तलावावर सैबेरिया देशातील ‘फ्लेमिंगो’ नावाच्या आठ परदेशी पक्षांचे आगमन झाले आहे. त्यात सहा प्रौढ तर दोन लहान आहेत. तलावाच्या मध्यभागी एक बेटासारखी झाडेझुडपे वाढलेली लहानशी टेकडी आहे. तेथे त्यांची मुक्कामी वसाहत आहे.

तलावात आठ ते दहा वर्षांपूर्वी कमळपुष्पांच्या शेतीसह मत्स्यपालनाचा व्यवसाय केला जायचा. काळ्या मातीचे लॅगुन्स, दलदल अन् नैसर्गिक उत्खनन, संचयनामुळे येथे लहान-लहान चिखलाची बेटे तयार झाली आहेत. स्मशान शांतता व कालव, शिंपल्यांच्या नानाविध प्रजाती येथे पहावयास मिळतात. फ्लेमिंगोंसाठी अशाप्रकारचे वातावरण पोषक मानले जाते. म्हणूनच या पक्षांची वसाहत यंदा येथे प्रथमच पाहावयास मिळत आहे.हरताळा तलाव हा र्शावणबाळाची समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात आता ‘फ्लेमिंगो’ या परदेशी पक्षांच्या आगमनाची भर पडली आहे. फिकट गुलाबी, सफेद रंग, लांब गुलाबी पाय, लांब पण नागमोडी मान, आखूड शेपटी, जाड गर्दलाल पण तुटल्याचा भास होणारी चोच, चार ते साडेचार फूट उंच अशा वर्णनाचे हे पक्षी निसर्गप्रेमींना येथे खुणावत आहेत. त्यांचा थवा जेव्हा आकाशात उडतो, तेव्हा त्यांच्या काळ्या झालरीच्या पंखावरील भडक केशरी रंगाच्या पिसांमुळे जणू अग्नीचा गोळा आकाशात भरारी तर मारत नाही ना? असा भास झाल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच या पक्षाला ‘अग्निपंख’ असेही संबोधले जाते. भुसावळच्या उपज संस्थेचे सचिव तथा पक्षी अभ्यासक सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे, यतीन चौधरी यांनी चार दिवसांपूर्वी हरताळा तलावावर पक्षी निरीक्षणासाठी भेट दिली होती. तेव्हा त्यांना येथे आठ फ्लेमिंगोंची वसाहत असल्याचे आढळून आले आहे.

ब्रिटिश म्युझियममध्ये फ्लेमिंगोंची नोंद
ब्रिटिश राजवटीत 1880 ते 1882 च्या दरम्यान तत्कालीन कलेक्टर जेम्स डेव्हीडसन यांना शहादा प्रकाशा व चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावानजीकच्या तापी नदीकाठावर हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षांचे दर्शन झाले होते. लंडनजवळील स्ट्रींग शहरात ‘ब्रिटिश नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये तशा आशयाची नोंद असल्याची माहिती अमळनेरचे पक्षी अभ्यासक अश्विन पाटील यांनी दिली आहे. जळगावच्या गिरणा पंपिंग स्टेशनजवळ 1984- 1985 मध्ये पक्षीमित्र अभय उजागरे व विनोद पाटील यांना हे पक्षी आढळले होते. वाघूर धरणावरही 30 डिसेंबर 2010 रोजी पक्षीमित्र संदीप सोनार व गणेश सोनार यांना तर 4 डिसेंबर 2012 रोजी पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणावर पक्षी अभ्यासक अश्विन पाटील यांना फ्लेमिंगो पक्षी आढळले होते. त्यानंतर आता मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा तलावावर ‘फ्लेमिंगो’ पक्षांची वसाहत निदर्शनास आली आहे. तलावातील बारीक किटक, शिंपल्यातील कालव, जलवनस्पती व त्यांच्या बिया, लहान मासे खाऊन ते पोट भरतात. त्यांच्या चोचीच्या विशिष्ट रचनेमुळे पाणी गाळून त्यातील माती व गाळ वेगळा केला जातो. लहान किटक व मासे खाता येतात. त्यालाच ‘फिल्टर फीडिंग’ म्हणतात. फ्लेमिंगो या पक्षांना गुलाबी रंग त्यांच्या आहारातील कॅरोटिनॉइड प्रोटीनमुळे येतो.

शास्त्रीय नाव ‘फेनिकॉप्टेरस रोझियश’
गुजरातने तर या फ्लेमिंगो या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा दिला आहे. रोहित, राजहंस, समुद्र राघू, पाकहंस या नावानेही तो ओळखला जातो. ‘फेनिकॉप्टेरस रोझियश’ असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. आकाराने बदकापेक्षा मोठे असलेले हे पक्षी पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, ओरिसातील चिलका सरोवरात मोठय़ा संख्येने आढळतात. प्रियाराधनसमयीच्या त्यांच्या हालचाली मनमोहक असतात. चरकसंहितेत या पक्षाचा उल्लेख ‘पाकहंस’ असा आढळतो. त्यांचा विणीचा काळ हा सप्टेंबर ते एप्रिल आहे. त्यांच्या लहान पिलांचे पोषण नर व मादी दोघे करतात. प्रोलॅक्टीन नावाच्या हॉरमोनच्या प्रभावाने पेषणीत दूध तयार होते. नर, मादी दोघेही पिलांना दूध पाजतात हे विशेष!

फ्लेमिंगोंचा स्थलांतराचा मार्ग
काबूल प्रांतातील बागलाण परगण्यात फ्लेमिंगो हे पक्षी मोठय़ा प्रमाणात आढळतात. तेथून ते भारतात हिवाळ्यात काही काळ पाहुणे येतात. गुजरात, राजस्थान, दिल्ली व कच्छच्या रणात या स्थलांतरित पक्षांची संख्या लक्षणीय असते. तेथून ते अन्य प्रांतात स्थलांतर करतात. कच्छच्या रणातून हे पक्षी हरताळा तलावावर पोषक वातावरण असल्यामुळे पाहुणचारासाठी आले असावेत, असे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात येते आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मढ खोर्‍यात गोड्या पाण्यावर जुलै महिन्यात या पक्षांची वसाहत आढळून येत असल्याची माहिती चोपडा येथील पर्यावरण अभ्यासक डॉ.सुरेश अलिझाड यांनी दिली आहे.

पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणीच
हरताळा तलावावर ‘फ्लेमिंगो’ पक्षांचे झालेले आगमन ही जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांसाठी आनंददायी पर्वणीच आहे. तलावावरील आठ पक्षांची ही वसाहत डोळ्यात साठवून ठेवावी, अशीच आहे. आवाजाची चाहूल लागल्यावर ते जेव्हा आकाशात भरारी मारतात, तेव्हा अग्नीचा गोळा तर जात नाही ना? असा भास होत असून तो नेत्रसुख देणारा आहे. झुंजूमुंजू पहाटेच्या वेळी तलावाच्या पूर्वेकडील दिशेला दलदलीच्या भागात या पक्षांचे समूहाने दर्शन होते. त्यांची उभे राहण्याची ऐट ही अतिशय रुबाबदार अशी आहे.
-सुरेंद्र चौधरी, पक्षीअभ्यासक, भुसावळ