आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 तासात झालेल्या पावसामुळे गिरणी नदीला पूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव/जळगाव - गिरणाकाठावरील गावांमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहिले. चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातून वाहणार्‍या गिरणा नदीला पूर आला. इतर ठिकाणी मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे.

चाळीसगाव तालुक्यात अधिक पाऊस
चाळीसगाव तालुक्यात भडगाव व पाचोरा तालुक्याच्या तुलनेत गेल्या 24 तासात जास्त पाऊस झाला. बहाळ, खेडगाव, टेकवाडे, धामणगाव, जामदा, भऊर, मेहुणबारे येथे बुधवारी पहाटे जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने गिरणा नदीला पूर आला. बहाळ येथे सात तर मेहुणबारे येथे मातीच्या सहा घरांचे नुकसान झाले. जामदा बंधारा ओसंडून वाहू लागला असून चाळीसगाव नगरपालिकेने बंधार्‍यावर बांधलेली एक फूट भिंत वाहून गेली. नदीपात्र खळखळून वाहत आहे. पाऊस झालेल्या ठिकाणी पिके पाण्याखाली गेली.

पाचोरा तालुक्यात पाणीसाठय़ात वाढ
पाचोरा शहरासह तालुक्यात दिवसभर पाऊस सुरू होता. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. गिरणा नदीला पाणी आले.हिवरा, बहुळा, अग्नावती, गडद, इंद्रायणी या नद्या वाहू लागल्या. अग्नावती, हिवरा, बहुळा, बाणेगाव-राजुरी, डांभुर्णी, कोल्हे, अटलगव्हाण, सार्वे पिंप्री, घोडसगाव, गारखेडा, बांबरूड, म्हसास, लोहारा, सुकळे, पिंपळगाव या प्रकल्पात काहीशा प्रमाणात वाढ झाली. दि. 24 पर्यंत 386 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच तारखेस केवळ 153.8 मिलीमीटर पाऊस झाला होता.

भडगावातील बंधारा फुल्ल
पावसाने भडगाव शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा फुल्ल झाला आहे. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पिचर्डे, खेडगाव, बात्सर या भागात पावसाने झोडपले. पिकांना आता ऊब हवी आहे. अन्यथा मावा, तुडतुडा या रोगांची लागण कपाशी, मका या पिकांवर होऊ शकते.

गिरणा धरणातील पाणीसाठय़ात वाढ
ठेंगोडा लघु प्रकल्पातून 900 क्यूसेस पाणी गिरणा धरणात सोडल्याने गिरणा धरणातील पाणीसाठय़ात दोन दिवसात 500 द.ल.घ.फू.ने वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळअखेर धरणात 2600 द.ल.घ.फू. पाणीसाठा होता. मृतसाठय़ात फक्त वाढ झाली आहे. टक्केवारी मात्र अद्याप वाढलेली नाही. गिरणा पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 135 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. अद्याप या भागात दमदार पाऊस नसल्याने चणकापूर, हरणबारी धरणात फारशी वाढ झालेली नाही. गिरणा धरणातील जलसाठय़ात वाढ व्हावी यासाठी गिरणा व तापी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी धरणावर जाऊन जलपूजन करीत वरुणराजाला साकडे घातले.

बोरी परिसरात पिकांची हानी
अमळनेर तालुक्यात बुधवारी सकाळी व सायंकाळी रिमझिम पाऊस झाला. बोरी धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बोरी नदीला पूर आला; तर तालुक्यात एका ठिकाणी घराची भिंत कोसळली. सावखेडा शिवारातील अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पीकस्थिती धोक्यात आहे.

धरणगाव तालुक्यात 15 घरांचे नुकसान
धरणगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. भीज पावसामुळे तालुक्यातील चार गावांमधील सात घरे कोसळली तर इतर ठिकाणी आठ घरांची पडझड झाली. जामोदा येथील आसाराम बन्सी भिल, बानूबाई देवराम भिल तर रोटवद येथील द्वारकाबाई आसाराम पाटील, कैलास दशरथ पाटील, आनंदा शंकर पाटील, सखूबाई पाटील, लीलाबाई चिंतामण मराठे यांची घरे कोसळली. धरणगावमधील रमेश गंगाराम वाघ, मंगलबाई सुरेश पाटील, प्रभाकर माधव पाटील, रमेश दत्तात्रय बाळापुरे, सुमनबाई गोवर्धन ब्राम्हणे यांच्या घरांची पडझड झाली. पिंप्री खुर्द येथेही तीन घरांचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी तहसीलदार महेंद्र पवार यांनी केली. नुकसानग्रस्त गावांना माजी आमदार गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. नुकसानग्रस्तांना मदत करावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिला. तालुक्यात आतापर्यंत 453.3 मि.मी.पाऊस झाला आहे. पारोळय़ात दुपारी रिमझिम पाऊस झाला. भीज पावसामुळे गुरव गल्लीतील संतोष गुरव व मडक्या मारुती चौकातील शिंपी यांच्या घराची भिंत कोसळली.