जळगाव - चार महिन्यांवर पावसाळा येवून ठेपला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ओढवलेली पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने नाल्यांवरील अतिक्रमणाचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. नकाशावरील नकाशावर नसतील अशा सगळ्याच नाल्यांची माेजणी करून पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्याचे आदेश या वेळी आयुक्तांनी शुक्रवारी दिले.
शहरातून वाहणा-या वेगवेगळ्या भागांतील नाल्यांवर रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. नैसर्गिक नाल्यांचे गटारीत रूपांतरित झाले आहे. गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसाने सगळ्याच नाल्यांना पूर आला होता. आयुक्त कापडणीस यांनी शुक्रवारी नगररचना कार्यालयात भेट देऊन सहायक संचालक चंद्रकांत निकम यांना शहरातील सगळ्याच नाल्यांची नकाशावरील माहिती तपासणे तसेच जे नाले नकाशावर नसतील, त्यांचे सर्वेक्षण करून नोंदणी करावी तसेच पूरनियंत्रण रेषा निश्चित करावी. नाल्यांचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात फी भरण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.