आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडूच्या फुलांचा बाजार बहरला, दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू खरेदीसाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवरात्रोत्सवातील विजया दशमीनिमित्त शहरातील फुले मार्केट, सुभाष चौक, घाणेकर चौक परिसरात दसऱ्याच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, फुलांचा बाजार सजला आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
पूजेसाठी लागणारी हळद, कुंकू, सुपारी, फळे, लाल कापडासह संपूर्ण साहित्याची एकत्रित पूजा मिळत आहे. विजयादशमी म्हटली की झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवर झेंडूच्या फुलांचे ढीग पसरले आहेत. साधारण ४० ते ५० रुपये किलो फुलांचा भाव आहे. तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारे काळे ऊस ही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. जोडीनुसार ४० , ६० ८० रुपयांप्रमाणे ते मिळत आहेत.

रावण दहनसाठी स्वतंत्र पार्किंग
विजयादशमीनिमित्तगुरुवारी मेहरूण तलावात रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी हाजी मलंगशहा दर्ग्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आणि विजयनगरच्या फलकाजवळ स्वतंत्र व्यवस्था केली असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे. रावण दहनासाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहने हाजी मलंगशहा दर्ग्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत, विजयनगरच्या फलकासमोरील सिमेंट रस्त्यावर लावावीत, मुख्य रस्त्यावर वाहने लावू नयेत, सेंट टेरेसा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याने प्रमुख अतिथी जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने लावू नयेत, अशा सूचना सरोदे यांनी दिल्या आहेत.

महापालिका इमारतीसमोर आज भारतमाता पूजन
नेहरूचौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे गुरुवारी महापालिका इमारतीसमोर सकाळी वाजता भारतमाता, शस्त्र ध्वज पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रक्तदान शिबिरही होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी कळवले आहे.