आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंदोबस्तात निघणार फुले मार्केटचे अतिक्रमण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- फुले मार्केटमधील वाढते अतिक्रमण व जागेवरून होणारे वाद नेहमीचेच झाल्याने पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी अतिक्रमणविरुद्ध मोहीम राबवण्याचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत.
फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटच्या आत व बाहेर दुकानांसमोर मोठय़ा प्रमाणात हातगाड्या लावून व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांमध्ये जागेच्या वादातून नेहमीच वाद होत असतात. बुधवारी तर थेट पार्किं गच्या जागेवर टेबल लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला होता. परंतु यादरम्यान तास दीडतास मार्केटमधील दुकाने बंद होती. चालायलाही जागा मिळत नसलेल्या फुले मार्केटमध्ये पार्किंगची मोठी समस्या निर्माण होते. त्यात दुकानांसमोरील पॅसेजमुळे ग्राहकांना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागते.
नेहमीचे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी अतिक्रमण विभागाला आदेश देऊन शुक्रवारी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश केले आहेत. कनिष्ठ अभियंता व कर्मचार्‍यांचे पथक यासंदर्भात कारवाई करणार असून मार्केटमधील कोणत्याही भागात दुकाने थाटणार्‍यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात दुकानदारांनाही त्यांच्या दुकानासमोरील पॅसेजमध्ये साहित्य न ठेवण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. या कारवाईनंतर पट्टे आखण्यात येणार असून त्यानंतरच दुकाने लावता येणार आहेत. तोपर्यंत कोणीही विक्रेता हातगाडी लावून व्यवसाय करू शकणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मार्केट चकाचक करण्याचे आदेश
अतिक्रमणासंदर्भातील कारवाई केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे मार्केटमध्ये साफसफाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने मार्केटमधील साफसफाईचे काम बंद केले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
शिवतीर्थ मैदानात विक्रेत्यांची सोय

फुले मार्केट परिसरात हातगाडी लावून व्यवसाय करणार्‍यांसाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शिवतीर्थ मैदानावर व्यवस्था करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. जळगावकरांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवतीर्थ मैदानावर (जी.एस.ग्राउंड) पार्किंगची सोय होणार असल्याने रस्त्यावर अथवा कुठेही वाहने लावल्याने अडथळा निर्माण होणार नाही. तसेच एकाच ठिकाणी सर्व विक्रेते राहणार असल्याने ग्राहकांनाही सोयीचे ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर अधिकृतरीत्या यासंदर्भात आदेश निघण्याची शक्यता आहे.