आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरशी लागलेल्या चार्‍यामुळे जनावरांना विषबाधेचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जास्तीच्या पावसामुळे जनावरांचे खाद्य असलेला ज्वारी आणि मक्याचा कडबा खराब झाला आहे. 40 अंशापर्यंत तापमान आणि 65 टक्के आद्र्रता या पोषक वातावरणामुळे कडब्यावर अँस्परजीलस नायगर बुरशी वाढली आहे. त्याचा परिणाम होऊन कडब्यात ऑक्झालिक अँसिडचे प्रमाण वाढले आहे. असा चारा खाण्यात आल्याने विषबाधा होवून जनावरे दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुधाळ जनावरांवर त्याचा झपाट्याने परिणाम होत आहे.
कडब्यामध्ये काही प्रमाणात असलेले ऑक्झालिक अँसिड हे जनावरांच्या पोटातील जंतुंमुळे विघटन पावते. मात्र, बुरशीमुळे चार्‍यात या अँसिडचे प्रमाण वाढल्याने जनावर दगावण्यास ते कारणीभूत ठरत आहे. रक्तात या अँसिडचे प्रमाण वाढल्याने त्याचा कॅल्शियमसोबत संयोग होऊन स्फटिक तयार होते. त्यामुळे जनावरांच्या अवयवाची हालचाल मंदावते. प्रसंगी जनावरे दगावत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुधाळ जनावरे खराब चार्‍याचा लवकर बळी ठरत आहेत.
ही आहेत लक्षणे
जनावर सुस्तावते, शरीराच्या तापमानात वाढ, लाळ गाळणे, खाणे-पिणे बंद होणे, जनावर एकाच जागेवर थांबून राहणे, नाक कोरडे पडणे, लघवीला त्रास होणे, जनावरांच्या मांड्यावर सुज येते, श्वसनाचा त्रास होतो. ही लक्षणे आठवडाभर आढळून आल्यास जनावर दगावण्याचा धोका असतो.
हे आहेत उपाय
बुरशीयुक्त पांढसर व पांढुरके ठिपके असलेला कडबा, कुटार जनावरांना खायला देऊ नये. वाळलेला आणि स्वच्छ कडबा द्यावा. काही प्रमाणात बुरशी असल्यास जनावरांना एक दिवस आधी चुन्याची निवळी शिंपडावी, ती वाळल्यानंतर कडबा खायला द्यावा. विषबाधा झालेल्या मोठय़ा जनावरांना एक ते दीड लिटर व लहान वासराला अर्धा लिटर दिवसातून तीन वेळा चुन्याची निवळी पाजावी. पशुवैद्यकीय दवाखान्याची मदत घ्यावी. कडबा कुट्टी किंवा कडबा साठवणूक करताना वाळवून घ्यावा. त्यावर चुन्याची निवळी शिंपडावी.
दुधाळ जनावरांना धोका
दुधाळ जनावरांच्या खाद्याची काळजी घेतली पाहीजे. बुरशीयुक्त चार्‍याचा लवकर परिणाम होतो. जनावर दगावण्याचा धोका असतो. शिवाय दुधावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
बुरशीयुक्त कडबा टाळा
कडबा ओलसर राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विषबाधा टाळण्यासाठी बुरशीयुक्त भाग काढून टाकावा. शक्य नसल्यास चुन्याची निवडी वापरणे आवश्यक आहे. जनावरांवर वेळेत पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार आवश्यक आहे.
-डॉ.व्ही.जी.फालक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
जनावरांना विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांचा दुधावरही परिणाम होतो. दुधाळ जनावर आजारी असल्यास त्यांच्या दुधाचा वापर टाळला पाहिजे. मुलांना सशक्त जनावरांचेच दूध दिले पाहिजे. दूधही उकळलेले किंवा पाश्चराइज्ड केलेले असावे.
-हेमंत पाटील, बालरोगतज्ज्ञ