जळगाव - कर्नाटक सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या रेपेटाेर कंपनीमार्फत कर्नाटकातील धारवाड रंगायनातील ३० कलावंतांना महाराष्ट्रातील कलावंतांनी लाेककलेचे प्रशिक्षण दिले. त्यात जळगावच्या धनंजय धनगरसह याेगेश थाेरात, सागर जाेशी यांचाही समावेश हाेता. त्यांनी महाराष्ट्रीयन लोककलेचे धडे देत तमाशातील वग, पूर्वरंग अाणि जागरणातील खंडाेबाचा उत्तरंग याचे प्रशिक्षण दिले. त्याचे सादरीकरण शनिवारी "म्हैसूर रंगायन' या प्रसिद्ध महाेत्सवात झाले. कर्नाटकात प्रथमच महाराष्ट्राच्या लाेककलेचे सादरीकरण कर्नाटकाच्याच कलावंतांनी केले अाहे.
कर्नाटक अाणि महाराष्ट्र यांचा भाषिक, प्रांतीय वाद एकीकडे सुरू असताना महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील ही सांस्कृतिक देवाणघेवाण मात्र एेतिहासिक ठरली अाहे. धनंजय धनगर याने मुंबई लाेककला अकादमीमध्ये गेल्या वर्षीच शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्रातील अनेक अनुभवी व्यक्ती असूनही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड करण्यात अाली. यात धनंजय हा दिग्दर्शक, याेगेश थाेरात नृत्य तर सागर जाेशी याने संगीत विभागाचे काम पाहिले. मू.जे.चे नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत कुळकर्णी, मुंबई लोककला विभागातील डाॅ.गणेश चंदानशिवे यांचे मार्गदर्शन धनंजयला मिळाले असून बेळगाव काॅलेज कन्नड भाषा विभागप्रमुख डी.एस. चाैघुले यांचे सहकार्य मिळाले.
३० निपुणकलावंतांची निवड
१२५ प्रयाेगतमाशा जागरणचे सादर होणार
कलावंतांची भाषा फक्त कन्नड असून त्यांची वेशभूषा, थीम सगळे मराठीतूनच अाहे. हा प्रयाेग बसवणे माेठे अाव्हान हाेते. मात्र, कलेला काेणीतही भाषा नसते, हे यात दिसून अाले. या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक कलावंतांना हिंदी, इंग्रजी भाषा येत नव्हती. मात्र, कलेचा अभिनय अाणि धनंजय याचा प्रायाेगिक नाटकापासून ते लाेककला अकदामीचा अनुभव, त्याला ज्ञात असलेल्या भाषिक ज्ञानामुळे समजावणे साेपे झाले.
काय अाहे रेपेटाेर?
"रेपेटाेर'म्हणजे लाेककला, नाटक सादर करणाऱ्या कलावंतांचा संच. यात कलावंत मानधन तत्त्वावर काम करतात. त्या-त्या राज्यातील अत्यंत पाच ललित कलांमधील ३० निपूण कलावंतांची निवड केली जाते. कलेला समृद्ध करण्याचे हे माध्यम असते. त्यांना वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर करायचे असतात. हे कलावंत यंदा महाराष्ट्राच्या लाेककलेचा अभ्यास करीत असून, त्यांना लाेककलेत पारंगत असलेल्या या तीन मराठी कलावंतांनी मार्गदर्शन केले. वर्षभरात तमाशा अाणि जागरण कार्यक्रमाचे जवळपास १२५ प्रयाेग सादर करण्यात येणार अाहेत.