आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Security Department,Latest News In Divya Marathi

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या 34 जणांवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे अधिकार्‍यांना कारवाई करण्यात अडचणी येत असल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभाग व पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांची तपासणी केली. या मोहिमेत बसस्थानक भागातील भजेगल्लीसह विविध वर्दळीच्या ठिकाणी अवैधरीत्या गाड्या लावणार्‍या 34 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अजून काही दिवस सुरू राहणार असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

मनपा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनातर्फे शुक्रवारी बसस्थानक, भजेगल्ली, जिल्हा रुग्णालय, नेरी नाका, अजिंठा चौफुली, सिंधी कॉलनी, रेल्वेस्थानक, बहिणाबाई उद्यान परिसरात तपासणी करण्यात आली. असुरक्षित पद्धतीने अन्न पदार्थ विक्री करताना आढळून आलेल्या 34 विक्रेत्यांकडील अन्न पदार्थ नष्ट करण्यात आले. या मोहिमेत अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी.यू.पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, आर.आर.चौधरी, एस. व्ही. पांडे, पालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील, आरोग्य अधीक्षक एस.बी.बडगुजर, एस. पी. अत्तरदे, आर.व्ही.पाटील, एन.ई.लोखंडे या अधिकार्‍यांचा समावेश होता.
कारवाईत सातत्य ठेवणार
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांची तपासणी करण्यात येते. केवळ एका दिवसापुरती नव्हे तर यापुढेदेखील ही मोहीम राबवली जाणार आहे. विकास पाटील, आरोग्याधिकारी

छोट्यांवर कारवाई, मोठय़ांचे काय?
पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरातील मोठय़ा हॉटेल तपासणी, अन्न पदार्थ, भेसळीची तपासणी करण्याचा विषय आल्यास महापालिका हद्दीतील अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडे बोट दाखवले जाते. शहरातील लोटगाड्यांवरील किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करताना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अधिकार्‍यांसह रस्त्यावर उतरतात. छोट्यांवर कारवाईसाठी एकत्र येणार्‍या अधिकार्‍यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार बड्यांच्या हॉटेलातील तपासणी केल्यास खर्‍या अर्थाने फरक पडेल.
शहरात उघड्यावर होत असलेल्या अन्न पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी तसेच आरोग्य अधिकार्‍यांना निर्देश दिले होते. - बी.यू.पाटील, सहायक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी