आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्य पदार्थांचे लवकरच डिस्प्ले सेंटर : उगले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘मुक्ताई सरस’ पुरता बचतगटांचे कार्य मर्यादित न राहता वर्षभर महिलांनी तयार केलेल्या मालाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी डीआरडीए ऑफीसमध्ये खाद्य पदार्थांचे डिस्प्ले सेंटर उभारण्यात येणार आहे. यात मुक्ताई सरसमधील बचतगटांच्या प्रत्येक वस्तू लावण्यात येतील. त्यामुळे ग्राहकांना वर्षभर सेंटरलाच ऑर्डर दिल्यानंतर सहज मिळतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे 21 ते 25 मार्चदरम्यान शिवतीर्थ मैदानावर सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत ‘मुक्ताई सरस’ बचतगटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, प्रकल्प संचालक वसंत पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी अनिल भोकरे, नंदू वाणी, डॉ.पी.सी.शिरसाठ, आर.आर.शिंदे, विस्तार अधिकारी किशोर राणे उपस्थित होते.
खान्देशी पदार्थांची मेजवानी : प्रदर्शनात ठेचा भाकरी, कळण्याची भाकरी, खापरावरील पुरणाच्या पोळ्या, कढी-फुनके, पालकचे पराठे, धिरडे, भरीत, भरलेली वांगी, पुडाच्या पातोड्या, वरण बट्टी, आंबाड्याची भाजी यासारखे अनेक खान्देशी पदार्थ आहेत. तसेच नागली, बिबडे, ज्वारी, बाजरी, कुरडई, उडीद पापडांचे स्टॉलसुद्धा यात उपलब्ध आहे.
प्रदर्शनातील स्टॉलचे भाडे केले माफ
जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झाले असून प्रदर्शनावेळी एका महिलेने सीईओंना सांगितले की, आम्हाला भाडे देणे कठीण आहे. हे ऐकून सीईओंनी भाडे माफ करण्याची घोषणा केली.
हस्तकलेच्या वस्तूंची भुरळ
हाताने बनविलेल्या चामड्यांच्या चपला, कापडी बॅग, पर्स, पिशव्या, पायदान, भोजन पट्टी, गालिचा, सतरंजी, मायक्रमच्या वस्तू, बांबूच्या टोपल्या, कापडाची गुढी आदी वस्तू ग्राहकांना भुरळ घालतात.
संध्याकाळी 5 वाजता होणार्‍या ‘मुक्ताई सरस’च्या उद्घाटनला संध्याकाळी 7 वाजेचा मुहूर्त गवसला. जिल्हाधिकार्‍यांच्या स्वागतासाठी अधिकारी बाहेर ताटकळत उभे होते. सीईओ या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अडकल्याने त्यांनादेखील विलंब झाला. मात्र, त्यानंतर दोन्ही अधिकार्‍यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विचारपूस केली.
अमळनेर, भडगाव, भादली, बोदवड, धरणगाव, अडावद, चोपडा, यावल, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद, धुळे, रायगड, हिंगोली येथील 200 बचत गटांचे स्टॉल आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभागाचे सुद्धा स्टॉल आले आहे. प्रदर्शनाला महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड, जनता बॅँक, बडोदा बॅँक यांचे सहकार्य आहे.