आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्पॅक्ट- डॉक्‍टरांच्‍या सुरक्षेसाठी अखेर समिती स्थापन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डॉक्टर व वैद्यकीय संस्थांवरील वाढत्या हल्लय़ाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या सुरक्षितता व रक्षा यावर नियंत्रण ठेवणार्‍या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीची पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एन.लाळीकर यांनी दिली. पाच महिन्यांनंतर या समितीचे कार्य आता प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने डॉक्टरांसोबतच रुग्णांनाही या समितीकडे कैफियत मांडता येणार आहे.
डॉक्टरांवरील हल्लय़ाची बाब लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात शासनाने गांभीर्याने घेत कायद्याची प्रभावी अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यापूर्वी पाच महिन्यांपासून जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करायच्या समितीची प्रशासनाला आठवण पडली होती. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने दि.4 फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाळीकर यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे सांगितले.
तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सदस्यांशी लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर आठवडाभरात या समितीची बैठक घेतली जाईल असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही डॉक्टर अथवा हॉस्पिटलवर हल्ला झाला तर त्यांना दाद मागता येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतील. तसेच डॉक्टरांकडून काही अन्याय झाल्यास रुग्णांनाही दाद मागण्यासाठी या समितीकडे जाता येणार आहे.