आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 कोटींची निविदा; मनपात ‘राजकारण’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील पारोळा रोडवरील नाल्यावर बीआरजीएफ योजनेंतर्गत रिटेनिंग वॉल बांधकामाशी संबंधित चार कोटींची निविदा मुदतीत भरता येऊ नये, यासाठी अडथळा आणण्यात आल्याची तक्रार ठेकेदारांकडून आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्याबाबत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असतानाच या निविदाप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

शहरातील सर्वात मोठा नाला पारोळा रोड परिसरातून वाहतो. या नाल्यावर बीआरजीएफ योजनेंतर्गत 4 कोटी रुपयांतून रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु या निविदा भरण्यास महापालिकेतील एका नगरसेवकाने मुदतीत कोणालाही निविदा भरता येऊ नये म्हणून निविदा दाखल करण्याच्या मुदतीच्या काळात संबंधित कर्मचार्‍याला जागेवर बसू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे इच्छुक ठेकेदारांना निविदा भरता आली नसल्याची तक्रार आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे करण्यात आली होती. या निविदेत काही नगरसेवकांनाही विशेष रस असल्याची चर्चा असल्याने त्याबाबत मोठे वादळ उठले होते. हे वादळ शमत नाही तोच विरोधी पक्षानेही यात उडी घेऊन आयुक्तांना निवेदन देऊन या निविदाप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याने ही निविदा वादात सापडली आहे. मुदतीत तीन ठेकेदारांकडून निविदा सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे; परंतु याबाबत आरोप-प्रत्यारोप होत असल्याने या निविदाप्रक्रियेला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या निविदाप्रक्रियेत नियमांचा कीस पाडण्याचा प्रकारही काही जणांकडून सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमके कोणते वळण घेतले, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते यावरच पुढील कार्यवाही अवलंबून आहे.