आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेक्का न्यायालयाचा चौघांना सश्रम कारावास, दाखवला होता पिस्तूलचा धाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पिस्तूलचा धाक दाखवून लूटमार करण्यासह खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी येथील मिल परिसरातील चाैघांना नाशिक येथील माेक्का न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास अाणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातील चौघांना माेक्का न्यायालयाने एकाच वेळी माेठी शिक्षा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात अाहे. या शिक्षेमुळे गुंड प्रवृत्तीला वचक बसेल, असे मत पाेलिस विभागाने व्यक्त केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय निसाळ यांनी बाजू मांडली.

येथील हाॅटेल न्यू गाैरवचे मालक तुषार रावण नवले यांचे वाहन अडवून त्यांना पिस्तूलचा धाक दाखवण्यात आला होता. तसेच खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात बंटी गायकवाड उर्फ पपय्या, मिलिंद अावटे, मयूर शार्दूल, गण्या मुंबई उर्फ सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील अाराेपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल होते.

गेल्या दहा वर्षांत त्यांनी संघटित टाेळी निमाण करून दहशत पसरवली होती. त्यामुळे त्यांना तीन तीनपेक्षा जास्त वर्षे शिक्षाही झाली होती. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पाेलिस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात येऊन त्यांच्या विराेधात माेक्का कायद्याने वाढीव कलम (१),(२), ३(२),३(४) लावण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा प्रस्ताव तत्कालीन उपविभागीय पाेलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्याकडे देण्यात अाला. तपास पूर्ण झाल्यावर अप्पर पाेलिस महासंचालकांनी दाेषाराेप पत्र माेक्का न्यायालयात दाखल करण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात आली.

त्यानुसार ३० जुलै २०१४ राेजी दाेषाराेपपत्र दाखल झाले. चौघांच्या विराेधात विविध पाेलिस ठाण्यात एकूण १८ गुन्हे दाखल असून, हे गुन्हेगार संघटितपणे टाेळी बनवून स्वत:च्या अार्थिक फायद्यासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे बंटी गायकवाड उर्फ पपय्या, मिलिंद अावटे, मयूर शार्दूल, गण्या मुंबई उर्फ सूर्यवंशी यांना दाेषी ठरवून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (माेक्का)चे कलम ३(१)(२) अन्वये ०५ वर्षे सश्रम कारावास प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा विशेष माेक्का न्यायालयाने सुनावल्याची माहिती अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

निकालात साक्षी ठरल्या महत्त्वाच्या...
या गुन्ह्याचा तपास चंद्रकांत गवळी यांनी केला. त्यांना यासाठी पाेलिस निरीक्षक श्रावण साेनवणे, पाेलिस उपनिरीक्षक सय्यद, पाेलिस उपनिरीक्षक व्ही. डी. पवार, सहायक पाेलिस उपनिरीक्षक पाटाेळे, पाेहेकाॅ ठाकरे, पाेलिस काॅन्स्टेबल देशमुख, मुकुंद पाटील, शीला सूर्यवंशी, संदीप माळी अादींनी सहकार्य केले. तर न्यायालयात सुनावणीवेळी फिर्यादी तुषार नवले, तत्कालीन विशेष पाेलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, अतिरिक्त पाेलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) संदीप बिष्णाेई, तपासी अंमलदार पाेसई पवार, उपविभागीय पाेलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांची साक्ष तपासण्यात अाली. ही साक्ष निकालासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

घटना दृष्टिक्षेपात..
शहरातीलहाॅटेल न्यू गाैरव येथून तुषार रावण नवले हे १५ मार्च २०१४ राेजी सायंकाळी घरून महिंद्रा एक्स यू.व्ही. (क्र.एमएच १८- ए.सी.६०० ) या वाहनाने जात होते. त्या वेळी चक्करबर्डी राेडवरील केरूजी नगर चाैकात एका कारमधून (क्र.एमएच ०१- पीए २७२५) अाराेपी बंटी रामदास पपय्या, मिलिंद अावटे, दत्तात्रेय उर्फ पप्पू निकम, राकेश पाटील, मयूर शार्दूल, निखिल भाबड गण्या मुंबई हे आले. त्यांनी तुषार नवले यांना मारहाण करून पिस्तूलचा धाक दाखवला. तसेच दहा हजार रुपये काढून घेतले. त्यानुसार या सर्वांविरुद्ध शहर पाेलिसांत खंडणी मारहाणीबाबत भादंवि कलम ३९५, ३८५, ३२३, ३४१, ५०४, ५०६, ३४ अार्म अॅक्ट कलम ३/१४ सह मुंबई पाेलिस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पवार यांच्याकडे होता. या प्रकरणी गण्या मुंबई वगळता इतर अाराेपींना १६ मार्च २०१४ राेजी अटक करण्यात अाली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा, भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे मुद्देमाल, वाहन जप्ती झाली.