जळगाव - हल्लीची मुले खूप पुढे गेली आहेत. तसेच ती खूप पैसाही कमावत असून, त्यांना आई-वडील नकोसे झाले आहेत. मात्र, यश पैशांपेक्षा आई-वडिलांच्या प्रेमाचे धन खूप मोठे आहे. त्यामुळे मुलांनी त्यालाच जीवनाची शिदोरी मानले पाहिजे, असे भावनिक उद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काढले.
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कुमारसिंग पाटील यांचा अमृतमहोत्सवी सोहळा सोमवारी ओंकार लॉन्स येथे झाला. त्यात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ.देवीसिंह शेखावत आर. ओ. पाटील उपस्थित होते. कुमारसिंग पाटील यांच्या मुलाने वडिलांप्रती कृतज्ञता म्हणून हा सोहळा आयोजित केला. अशी मुले खूप कमी असल्याचे सांगत प्रतिभाताई पाटील म्हणाल्या की, आई-वडिलांनी जसे संस्कार केले तशी मुले घडत असतात. मात्र, जीवनात कितीही यश मिळवले, पैसा कमावला तरीही आई-वडील संस्कृतीशी नाते तोडू नका.
आई-वडील मुलांसाठी झटतात, त्यांना शिक्षण देतात. मात्र, सगळीच मुले याची जाणीव ठेवत नाही. आई-वडिलांच्या प्रेमाची शिदोरी खूप महत्त्वाची असते, असेही त्या म्हणाल्या. नितीन पाटील यांनी प्रास्ताविकात वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतला शेती व्यवसायात झोकून दिल्याचे सांगितले. या वेळी पद्मश्री मोईनुद्दीन खान प्रसाद दुसाने यांनी गीते सादर केली. अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी सहायता समितीच्या ग्रंथालयाला ग्रंथांची भेट काश्मिरी बांधवांना मदत देण्यात आली. याप्रसंगी आमदार किशाेर पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार महेंद्रसिंह पाटील आदी उपस्थित होते.